मुंबई : गेल्या काही वर्षांपासून पश्चिम रेल्वेवरील पालघर स्थानकावर लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी, प्रवाशांची मागणी होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेवरील रेल्वेगाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात येत आहे. त्यामुळे पालघर येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेवरील दोन रेल्वेगाड्यांना पालघर येथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला. गाडी क्रमांक २२९५५/२२९५६ वांद्रे टर्मिनस-भुज कच्छ एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२४९०/१२४८९ दादर-बिकानेर एक्स्प्रेस या दोन रेल्वेगाड्यांना पालघर स्थानकात प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यास सुरुवात झाली आहे.
पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथून निघणाऱ्या गाडी क्रमांक २२९५५ वांद्रे टर्मिनस – भुज कच्छ एक्स्प्रेसला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी पालघर स्थानकावर सायंकाळी ७ वाजता पोहोचेल आणि सायंकाळी ७.०२ वाजता पालघरवरून सुटेल. ही रेल्वेगाडी दोन मिनिटे पालघर स्थानकात उभी राहील. त्याचप्रमाणे भुज येथून निघणाऱ्या गाडी क्रमांक २२९५६ भुज – वांद्रे टर्मिनस कच्छ एक्स्प्रेसला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी पालघर स्थानकात सकाळी ९.३४ वाजता पोहोचेल आणि ०९.३६ वाजता निघेल.
दादरहून प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२४९० दादर – बिकानेर एक्स्प्रेसला पालघर स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी पालघर स्थानकात दुपारी ४.१४ वाजता पोहोचेल आणि दुपारी ४.१६ वाजता निघेल. त्याचप्रमाणे, बिकानेरहून प्रवास सुरू करणाऱ्या गाडी क्रमांक १२४८९ बिकानेर – दादर एक्स्प्रेसला पालघर स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी पालघर स्थानकात सकाळी ११.१२ वाजता पोहोचेल आणि सकाळी ११.१४ वाजता सुटेल. या दोन्ही रेल्वेगाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा दिला आहे. त्यामुळे पालघर येथील प्रवाशांना प्रवास करणे सोयीस्कर झाले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने याआधीही पश्चिम रेल्वेवरील दादर – भुसावळ विशेष रेल्वेगाडीला पालघर येथे थांबा दिला आहे. गाडी क्रमांक ०९०५१ / ०९०५२ दादर – भुसावळ विशेष रेल्वेगाडी मार्च २०२५ पासून पालघर येथे थांबत आहे. गाडी क्रमांक ०९०५१ दादर – भुसावळ विशेष रेल्वेगाडी रात्री १२.०५ वाजता दादरहून सुटते. ही रेल्वेगाडी पालघर स्थानकात रात्री १.२९ वाजता थांबते आणि तिथून रात्री १.३१ वाजता सुटते. तर, गाडी क्रमांक ०९०५२ भुसावळ – दादर विशेष रेल्वेगाडी सायंकाळी ५.४० वाजता भुसावळवरून सुटते. ही रेल्वेगाडी पालघर स्थानकात रात्री ३.१७ वाजता पोहोचते आणि रात्री ३.१९ वाजता सुटते.