मुंबई : साहित्य व नाट्यक्षेत्रात गेली आठ दशके कार्यरत असलेल्या गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत विरोधकांनी राजकीय पक्षाचा आधार घेवूनही परिवर्तन काही झाले नाही. संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे ऊर्जा पॅनेलला मतदारांनी कौल दिला असून मंगलप्रभात लोढाप्रणित भालेराव विचार मंचचा पार धुव्वा उडाला आहे.
संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी रविवारी पहाटे पूर्ण झाली. नियामक मंडळाच्या ३५ जागांमध्ये ऊर्जा पॅनलचे २५ तर भालेराव विचार मंचचे १० उमदेवार विजयी झाले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची मतमोजणी दोन दिवसापूर्वी झाली असून त्यामध्ये ऊर्जा पॅनेलच्या उषा तांबे विजयी ठरल्या होत्या. उपाध्यक्षपदाच्या ७ जागांमध्ये ऊर्जा पॅनेलने ५ तर भालेराव विचार मंचने दोन जागा पटकावल्या आहेत.
मतपत्रिकांची पळवापळवी, राजकीय पक्षांची मदत, खरे विरुद्ध खोटे वारसादर, कुटुंबातील उमेदवार आदी आरोपांमुळे ही निवडणुक लक्षवेधी ठरली होती. निवडून आलेल्या सदस्यांची बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असून त्यामध्ये १२ कार्यकारणी सदस्य निवडले जातील. कार्यरणीमधून प्रमुख कार्यवाह, कार्याध्यक्ष आणि कोषाध्यक्ष यांच्या निवडी होतील.
यशोधन दिवेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
स्थानिक भाजप आमदार व राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सक्रियतेमुळे निवडणुक रंगली होती. संघाची निवडणूक बहुंताश वेळी बिनविरोध झालेली आहे. यावेळी मात्र विद्यमान कार्यकारणीत मतभेद झाल्याने नाट्यअभिनेते प्रमोद पवार यांनी भालेराव विचार मंच हा पॅनेल उभा केला होता. भालेराव विचार मंच हा भाजप पुरस्कृत पॅनेल असल्याचा आरोप झाला होता.
महिलांची बाजी :
नियामक मंडळाच्या ३५ पैकी २५ जागी ऊर्जा पॅनलचेच उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात १५ महिला आहेत. संस्थेच्या कामकाजात यंदा निवडून आलेल्या १७ महिलांचा सहभाग लक्षणीय असेल. त्या सर्व महिला ऊर्जा पॅनलच्या आहेत.
शरद पवारांचे मत वैध :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संघाचे सभासद आहेत. त्यांच्या मतपत्रिकेवरुन मतभेद झाले होते. शेवटी पवार यांना पत्रिका कुरिअर केल्याचे पुरावे दाखवल्यानंतर पवारांचे मत वैध ठरवण्यात आले. १४०० मतदारांपैकी ६४० मतदारांनी मतदान केले.
विजयी उमेदवार :
ऊर्जा पॅनेल : अध्यक्ष उषा तांबे, उपाध्यक्ष- विजय केंकरे, अनिल बांदिवडेकर, सुदेश हिंगलासपूरकर, अशोक कोठावळे, रेखा नार्वेकर. नियामक मंडळ सदस्य- सुबोध आचवल, संगीता अरबुने, एकनाथ आव्हाड, प्रियांका बांदिवडेकर, दिपाली भागवत, सुभाष भागवत, मनन भालेराव, अश्विनी भालेराव, प्रतिभा बिस्वास, धनश्री धारप, मोनिका गजेंद्रगडकर, चंद्रशेखर गोखले, मिनाक्षी जयकर, मिलींद जोग, अरुण जोशी, ज्योति कपिले, सुहासिनी कीर्तीकर, उज्ज्वला मेहंदळे, ज्ञानेश पेंढारकर, अमेय पुरंदरे, अरुण फडके, प्रतिभा सराफ, अर्पणा साठे, सावित्री हेगडे, अनुपमा उजगरे, असे ३१ उमेदवार विजयी झाले आहेत.
भालेराव विचार मंच :
उपाध्यक्ष- जयराज साळगावकर, मधुकर वर्तक. नियामक मंडळ सदस्य-दिलीप भाटेवडेकर, चंद्रकांत भोंजाळ, विजयराज बोधनकर, रविंद्र गोळे, प्रकाश कामत, विकास परांजपे, नरेंद्र पाठक, प्रमोद पवार, गीतेश शिंदे, चंद्रशेखर वझे असे १२ उमेदवार विजयी झाले आहेत.