मुंबई : एका अल्पवयीन मुलासह दोघांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करून एकमेकांसोबत लैंगिक कृत्य करायला भाग पाडणारा एक भयंकर प्रकार भुलेश्वर येथे उघडकीस आला. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याने एका आरोपीला अटक केली असून त्याच्या तीन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. या तरुणांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन्ही पीडित परभणी जिल्ह्यातील असून यापैकी एक अल्पवयीन आहे,, तर दुसरा पीडित १९ वर्षांचा आहे. या दोघांनी एका अंगडियाकडून कर्ज घेतले होते. मात्र ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. अंगडिया आणि त्याच्या साथीदारांनी ४ जुलै रोजी या दोन्ही पीडितांना परभणी येथून आपल्या वाहनात बळजबरीने बसवून पुण्यात आणले. तेथून त्यांच्यावरील अत्याचाराला सुरवात झाली.

अमानुष मारहाण

गाडीमध्ये या दोघांना मारहाण करण्यात आली. पुण्याला नेऊन त्यांना एका खोलीत डांबण्यात आले. तेथे ४ जणांनी चामड्याच्या पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. बाहेर पडायचे असेल तर तात्काळ घेतलेल्या पैशांची परतफेड करावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर या दोघांना मुंबईतील भुलेश्वरमधील काळबादेवी रस्त्यावरील पोकळवाडी इमारतीतील पहिल्या मजल्यावर आणण्यात आले. तेथे या आरोपीचे कार्यालय होते. तेथे या दोघांना पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांचे कपडे काढून एकमेकांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या कृत्याचे आरोपीनी आपल्या मोबाइलमध्ये चित्रिकरण केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाला अटक, तिघे फरार

या पीडित तरुणांनी आपल्या घरी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यापैकी एका तरुणाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. मार्ग) पोलिसांनी याप्रकऱणी अंगडियाला अटक केली. त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८ (१), १२७ (२), १३७ (२), १४० (३), ३(५), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यातील कलम १२, १४ (२), ४ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक भाले करीत आहेत.