मुंबई : परळ टीटी पुलाच्या मोठ्या संरचनात्मक दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. वारंवार खड्डे पडणाऱ्या या पुलाचे आता कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या पुलाच्या मोठ्या दुरुस्तीच्या कामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहेत. एक मार्गिका बंद ठेवून काम केले जाणार असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.
परळ टीटी पूल हा शहर आणि पूर्व उपनगराला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने जात असल्यामुळे त्यावर वारंवार खड्डे पडतात. त्यामुळे या पुलाची वारंवार दुरुस्ती करावी लागते. या पुलावर मोठ्या संख्येने जोडसांधे असल्यामुळे वाहनांना वारंवार झटके बसतात. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या पुलाची मोठी दुरुस्तीची कामे हाती घेता आली नव्हती.
लोअर परळ पुलाचेही काम काही वर्षांपर्यंत सुरू होते. त्यातच हा पुलही दुरुस्तीसाठी बंद केल्यास परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती. त्यामुळे या पुलाच्या मोठ्या दुरुस्तीची कामे पुढे ढकलण्यात आली होती. मात्र डांबराचा थर बदलून पुलाचे पुनपृष्ठीकरण करण्याचे काम डिसेंबर २०२३ मध्ये करण्यात आले होते. आता या पुलाची मोठी दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे पूल विभागाने ठरवले आहे.
पुलावरील जोडसांधे कमी करणार
या पुलाची मोठी संरचनात्मक दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यात पुलाचे बेअरींग बदलण्याचे कामही केले जाणार आहे. या पुलावर २२ ठिकाणी जोडसांधे आहेत ते कमी करून १० वर आणण्यात येणार आहेत. त्याकरीता पुलाचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना गुळगुळीत पृष्ठभागावरून वाहने चालवणे सोयीचे होणार आहे.
एक एक मार्गिका बंद ठेवणार
शहर भागातील हा अत्यंत महत्त्वाचा पूल असून पूल पूर्ण बंद ठेवून काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुलाची एक एक मार्गिका बंद ठेवून त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम केले जाणार आहे. त्याच पद्धतीने वाहतूक पोलिसांची परवानगी घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. तसेच पुलाच्या बाजूनेही वाहनांसाठी मार्ग (स्लीप रोड) असल्यामुळे वाहतुकीस फार अडथळा येणार नाही, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
साडेतीन महिने काम चालणार
पुलाच्या दुरुस्तीची कामे ऑक्टोबर महिन्यात हाती घेण्यात येणार असून ही कामे तीन ते साडेतीन महिने चालणार आहेत.