मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’ मार्गिकेवर प्रवास करण्यासाठी आता प्रवाशांना नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्डचा (एनसीएमसी) वापर करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसीचे अनावरण करण्यात आले. या कार्डचा वापर बुधवारपासून प्रवाशांना करता येणार असून या कार्डमुळे आता प्रवाशांना तिकीटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल केला. बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा २ अ ही नुकताच सेवेत दाखल झाला आहे. या मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढावी यासाठी एमएमआरसी विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता एमएमआरसीने प्रवाशांचा प्रवास सुकर आणि रोकडविरहित करण्यासाठी एनसीएमसी कार्डचा पर्याय आणला आहे. नॅशनल पेमेंटस काॅर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने एमएमआरसीने एनसीएमसी कार्ड सेवा सुरू केली आहे.

या कार्डद्वारे आता आरे – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यान प्रवास करता येणार आहे. या कार्डमुळे आता प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहून वेळ खर्ची करावा लागणार नाही. महत्त्वाचे म्हणजे या कार्डची जोडणी ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’, ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ या मार्गिकांशी करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्डचा वापर प्रवाशांना ‘मेट्रो ३’ बरोबरच ‘मेट्रो १’, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठीही करता येणार आहे, अशी माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे कार्ड बुधवारपासून ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यानच्या कोणत्याही मेट्रो स्थानकांवर खरेदी करता येणार आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखांमध्येही हे कार्ड उपलब्ध होणार आहे. हे कार्ड मोफत उपलब्ध होणार आहे, मात्र या कार्डचा वापर करण्यासाठी, या कार्डवरून प्रवास करण्यासाठी कार्डधारकांना एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतचे टाॅप अप करणे अनिवार्य असणार आहे. या कार्डच्या वापरामुळे आता प्रवाशांचा ‘मेट्रो ३’चा प्रवास सुकर होणार आहे.