मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) दरवर्षी इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) परीक्षा घेते. शुक्रवारपासून सुरू झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गणित व इंग्रजी या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या. त्यामुळे एससीईआरटीकडून परीक्षेबाबत पाळण्यात येणाऱ्या काटेकोरपणाचा व गुप्ततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार्स) या केंद्र सरकार पुरस्कृत प्रकल्पांतर्गत २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ अशा तीन नियतकालिक चाचण्या एकूण १० माध्यमांत घेण्यात येणार आहेत. त्यानुसार इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रथम भाषा, तृतीय भाषा (इंग्रजी) आणि गणित या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून शाळांना पाठविण्यात येणार आहेत. या विषयांची प्रश्नपत्रिका शिक्षकांना शाळा स्तरावर काढण्यास परवानगी नसते. त्यानुसार या पॅट परीक्षेला शुक्रवारपासून सुरूवात झाली.
शुक्रवारी प्रथम भाषा विषयाची परीक्षा झाली. त्यानंतर शनिवारी गणित व सोमवारी इंग्रजी या विषयांची परीक्षा असणार आहे. मात्र शुक्रवारी सायकाळच्या सुमारास इयत्ता तिसरी, चौथी, सहावी, सातवी व आठवीचे यांचे गणित व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिका काही क्लासच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झाल्याच्या आढळून आल्या आहेत. तसेच त्यावर १०० टक्के खरी प्रश्नपत्रिका असल्याचेही नमूद केले होते. प्रश्नपत्रिकेत असलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यामध्ये दिली आहेत. तर काही प्रश्नपत्रिका या संबंधित क्लासने सोडवूनही दाखवल्या होत्या.
यूट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रश्नपत्रिकेला काही क्षणातच पालक व विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या तासाभरात या प्रश्नपत्रिका जवळपास सात ते आठ हजार लोकांपर्यंत पोहचल्या. समाज माध्यमांवर जाहीर झालेल्या प्रश्नपत्रिकांची लिंक काही पालकांनी शिक्षकांना पाठवून यात तथ्य आहे का? अशीही विचारणा केली. त्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावर यांच्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
प्रश्नपत्रिकेच्या नक्कल काढण्यावर शिक्षक धारेवर
दरवर्षी पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अपुऱ्या संख्येने येत असल्याने शिक्षकांना त्याची नक्कल प्रत काढावी लागते. गतवर्षी मुंबईतील काही शाळांमधील शिक्षकांनी नक्कल प्रत काढल्याने त्यांना धारेवर धरण्यात आले होते. त्यामुळे ऑनलाईन प्रसिद्ध झालेल्या या प्रश्नपत्रिकांमुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, याला जबाबदार काण असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेत फरक
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यात आलेला अभ्यासक्रम आणि प्रथम भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रचंड तफावत असल्याचे आढळून आले. बहुतांश प्रश्न अभ्यासक्रमाव्यतिरिक्त असल्याने परीक्षेमध्ये विद्यार्थी त्रस्त झाले होते. तसेच या प्रश्नांची काठिण्यपातळीही प्रचंड असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता.