मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०१६ च्या सोडतीतील पत्राचाळ योजनेतील ३०६ घरांसाठीच्या विजेत्यांची हक्काच्या घराची प्रतीक्षा काही संपताना दिसत नाही. या घरांचे काम पूर्ण झाले असले तरी केवळ भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने घराचा ताबा रखडला आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळावे यासाठी मुंबई मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत.
गोरेगाव येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत मुंबई मंडळाला अंदाजे २७०० घरे सोडतीसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र हा प्रकल्प वादग्रस्त ठरल्याने आणि नंतर विकासकाकडून प्रकल्प काढून घेत राज्य सरकारने तो म्हाडाच्या ताब्यात दिल्याने ही घरे पूर्ण होऊ शकली नाहीत. दरम्यान विकासकाने मुंबई मंडळाच्या हिश्श्यातील ३०६ घरांचे काम सुरू केले होते. त्यामुळे २०१६ मध्ये मुंबई मंडळाने वादग्रस्त प्रकल्पातील ३०६ घरे २०१६ च्या सोडतीत समाविष्ट केली होती. या सोडतीला आठ वर्षे पूर्ण झाली तरी विजेत्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. विकासकाने ३०६ घरांचे काम अर्धवट सोडल्याने ताबा रखडला होता. तर मुंबई मंडळाने २०२२ मध्ये ३०६ घरांचा समावेश असलेल्या इमारतींचे काम पूर्ण करण्यास सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वीच इमारतींचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. पण आता भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने ताबा रखडला आहे.
हेही वाचा…नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! रद्दी कागदात खाद्यापदार्थ बांधून देण्यावरील पालिकेच्या बंदी आदेशास हरताळ
मुंबई मंडळाने भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एप्रिलमध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळेल आणि मेपासून ताबा प्रक्रिया सुरू होईल, अशी मंडळाला अपेक्षा होती. मात्र मुंबई महापालिकेकडून अद्यापही भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने विजेत्यांची प्रतीक्षा लांबली आहे. याविषयी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर तात्काळ विजेत्यांना घराचा ताबा देण्यास सुरुवात होईल, असे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.