लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मानखुर्दमध्ये रस्त्यावर कोंबडीचे मांस शिवजून तयार केलेला शॉर्मा खाल्ल्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली. या घटनेमुळे रस्त्यावर शिजवून विक्री करण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय मुंबई महापालिकेने रद्दी कागदात खाद्यापदार्थ बांधून देण्यावर बंदी घातली असतानाही फेरीवाल्यांनी त्याला हरताळ फासला आहे.
मुंबईमधील अनेक भागांमध्ये रस्त्यावर वडापाव, भजी, समोसा, मसाला डोसा, इडली, रगडा पॅटीस, भेळ, चायनीज पदार्थ यांसह भाजी, पोळी, भात, डाळ अशी जेवणाची थाळी आदी पदार्थांची विक्री करण्यात येते. हे खाद्यापदार्थ रस्त्यावरच शिजविण्यात येतात आणि त्यांची विक्री करण्यात येते. मात्र पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, तेल आदींच्या, तसेच शिवजवेल्या अन्नपदार्थांच्या दर्जाची तपासणीच होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत खाद्यापदार्थांची विक्री होत असलेल्या अनेक खाऊ गल्ल्या निर्माण झाल्या आहेत. अनेक मंडळी हॉटेलमध्ये जाणे परवडत नसल्यामुळे या खाऊ गल्ल्यांमध्ये स्वस्तात मिळणारे पदार्थ खावून आपली भूक भागवतात. मात्र या अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
आणखी वाचा-मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली, कुलाब्यात शनिवारी आठ तास पाणी पुरवठा बंद राहणार
पावसाळा जवळ आल्यानंतर जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी महापालिका रस्त्यांवरील सरबतवाले, फळांच्या रसाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करते. मात्र रस्त्यावर शिजवलेल्या अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांकडे काणाडोळा झाला आहे. त्यामुळेच रस्त्यावर खाद्यापदार्थांची विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वर्तमानपत्राची शाई आरोग्यासाठी घातक आहे. ही शाई पोटात गेल्यास दुर्धर असे आजार होवू शकतात. त्यामुळे काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने वर्तमानपत्रामध्ये खाद्यापदार्थ बांधून देवू नये असे आदेश जारी केले आहेत. मात्र हे आदेश कागदावरच राहिले आहेत.
मुंबईतील अनेक फेरीवाले खाद्यापदार्थ वर्तमानपत्रातच बांधून देत आहेत. वर्तमानपत्रात बांधून दिलेल्या खाद्यापदार्थांना शाई लागते. ही शाई पोटात गेल्यास त्यातील विरेचकांमुळे मूत्रपिंड, यकृत यासारख्या महत्त्वाच्या अवयवांवर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. शाईमधील रोधक पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात. हे खाद्यापदार्थ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहेत. खाद्यापदार्थ वर्तमानपत्रात बांधून देणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेचा अंकुश नाही. यासंदर्भात तपासणीच होत नाही. त्यामुळे फेरीवाल्यांचे फावत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
आणखी वाचा-मुंबई: शिवडी-वरळी उन्नत रस्त्याचे ६५ टक्के काम पूर्ण, पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाणार
‘रस्त्यावरील उघडे, शिळे अन्न खाणे टाळा’ खाद्यापदार्थ निकृष्ट दर्जाचे, बरेचदा शिळे व योग्य पध्दतीने साठवलेले नसल्याचे निदर्शनास येते. त्यातही उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे खाद्यापदार्थ लवकर खराब होतात. खराब व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे अन्न विषबाधा सारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. नुकतेच महानगरपालिका क्षेत्रातील पी उत्तर आणि एम पूर्व विभागामध्ये उघड्यावरील खाद्यापदार्थातून अन्न विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. अशाप्रकारच्या अन्न विषबाधेमुळे जीवावर बेतू शकते, ही बाब लक्षात घेत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिकेच्या सूचना
- बाहेरील व रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांकडून पेय आणि खाद्यापदार्थ खाण्याचे टाळावे.
- शक्यतो घरात शिजवलेले, ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. शिजवलेले अन्न झाकून ठेवावे. शिळे अन्न खाणेदेखील टाळावे.
- चिकन, मटण व मासे यासारख्या पदार्थांचे सेवन करण्यआधी ते ताजे, स्वच्छ व व्यवस्थित शिजलेले आहेत, याची खात्री करुन घ्यावी.
- लहान मुले रस्त्यावरील खाद्यापदार्थांचे सेवन करणार नाहीत, याबाबतीत पालकांनी दक्षता घ्यावी.
- गर्भवती महिलांनी प्रामुख्याने दुसऱ्या तिमाहीमध्ये वैयक्तिक स्वच्छता व पौष्टिक आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.
- स्वच्छ पाण्याने धुवून हिरव्या भाजीपाला आणि फळे यांचे सेवन करावे.
- प्रसाधनानंतर व स्वयंपाकापूर्वी हात नियमितपणे स्वच्छ धुवावे आणि वैयक्तिक स्वछता पाळावी.
- उलटी, जुलाब, मळमळ यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पालिका दवाखाने अथवा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.