मुंबई : मशीद बंदर येथे राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी पायधुनी पोलिसांनी शनिवारी २० वर्षीय प्रियकराला अटक केली. या तरूणीने ८ मार्च रोजी राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या पालकांनी त्यांच्या इमारतीतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण आणि मुलीच्या मोबाइलवरील संदेश पाहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी पायधुनी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुणी मशीद बंदर येथे पालकांसोबत राहत होती. तिच्या वडिलांचा बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आहे. तर आई गृहिणी आहे. तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी २० वर्षीय आरोपी प्रियकराला पायधुनी पोलिसांनी शनिवारी अटक केली. याप्रकरणी आरोपीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती उपायुक्त मोहित गर्ग यांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी चर्नीरोड येथील महाविद्यालयात बँकेशी संबंधित पदवीधर शिक्षण घेत होती. तरूणीने ८ मे रोजी राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून घरी आली. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी मुलीला दूरध्वनी केला. पण मुलीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांना घरी जाऊन मुलीला आपल्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावेळी शेजाऱ्यांनी पाहिले असता तिने घरात गळफास घेतला होता. त्यामुळे शेजारी घाबरले त्यांनी तातडीने मुलीला जवळच्याच नूर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांनी मुलीच्या पालकांनी त्यांच्या इमारतीतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहिले असता आरोपी तरूण आणि त्यांची एक मैत्रिण आत्महत्येच्या दिवशी घरी आले होते. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणानुसार ते त्यांच्या घरात डोकावत असल्याचे दिसून आले. मुलीच्या मोबाइलमधील कॉल लॉग तपासण्यात आले. त्यात आत्महत्येच्या दिवशी आरोपी तरूणाने तिला अनेक दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांच्या मैत्रिणीने अनेक मिस्ड कॉल्स केल्याचे आढळले. आरोपी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या परीचित होता. त्यानंतर कुटुंबियांनी तिचे संदेश तपासले असता आरोपी व मुलीमध्ये अनेक संदेश होते. तरूणीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता. त्यांच्या संदेशातून ते स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पायधुनी पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी आरोपीलाअटक केली.