निवडणुकीचे वातावरण असल्यानेच घरांच्या नावे सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा ठपका ठेवतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.हिरानंदानीने घरे दिली नाहीत ही बाब न्यायप्रविष्ठ आहे, असे सांगत त्यावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.
लोकांना कोणी अर्जांचे वाटप केले, त्यांना मंत्रालयात येण्यास कोणी भाग पाडले याची सारी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने मंगळवारी अर्ज का स्वीकारले या प्रश्नावर, जनतेकडून काही तक्रारी आल्या असाव्यात म्हणून त्या स्वीकारण्यात आल्या होत्या, असे चव्हाण यांनी सांगितले. कोणीतरी हे खोडसाळपणे केले असून, प्रकाश आंबेडकर अथवा अन्य कोणी त्याची जबाबदारी स्वीकारली असल्यास त्याचीही चौकशी करण्यात येईल. अर्ज विक्रीसाठी पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
हा सारा प्रकार हिरानंदानी बिल्डर्समुळे घडला याकडे लक्ष वेधण्यात आले असता, हे सारे प्रकरण न्यायप्रवीष्ठ आहे. कोणाला झुकते माप देण्याचा सरकारचा अजिबात प्रयत्न नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अर्जाचे काय होणार?
घरवाटप योजनाच नसून ही अफवा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करूनही हजारो अर्ज आले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे ते सादर केले जाणार आहेत. त्याचे पुढे काय होणार व खरेच घर मिळणार काय, अशी चर्चा या लोकांमध्ये होत होती. आता सोमवारी पुन्हा सर्वाना मंत्रालय परिसरात येण्याचे आवाहन करण्यात येत होते.