मुंबई : ताल आणि तालवाद्यांच्या जगात त्यांनी फक्त अनवट प्रयोग केले नाहीत, तर तालवाद्यांच्या जादूने रसिकांची मने जिंकत संगीताच्या एका समृद्ध दालनाची ओळख करून दिली. ‘ताल’ हा ज्यांचा ध्यास आहे, अशा तालसम्राट तौफिक कुरेशी यांच्याशी आज ‘लोकसत्ता गप्पांची’ मैफील रंगणार आहे.
तालांचा शोध तौफिक यांना स्वस्थ बसू देत नाही आणि या शोधातूनच त्यांनी किती तरी सुंदर तालांची निर्मिती केली आहे. मग ते प्रयोग आफ्रिकन जेम्बे, ड्रम या विविध तालवाद्यांवर भारतीय ताल वाजवण्याचे असोत किंवा अगदी बालपणापासून परिचित असलेले त्या शहराचे ताल घेऊन ‘मुंबई स्टँप’सारख्या निराळ्या प्रयोगातून त्यांनी रसिकांना अनोख्या तालांची ओळख करून दिली.
अशा ‘ताल’काराचे परिचित आणि अपरिचित विश्व ‘लोकसत्ता गप्पा’च्या निमित्ताने उलगडणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, ५ जुलै रोजी होत असून यावेळी तौफिक कुरेशी यांच्याशी प्रसिद्ध लेखक-गायक आणि संगीत अभ्यासक डॉ. आशुतोष जावडेकर संवाद साधणार आहेत. विविध तालवाद्यांवर भारतीय शास्त्रोक्त संगीताचे प्रयोग रूढ करण्याबरोबरच कुरेशी यांनी चित्रपट संगीतातही तालवाद्यांचा प्रभावी वापर केला.
जगप्रसिद्ध अशा दोन दिग्गज कलावंतांकडून मिळालेला संगीताचा वारसा आणि नवनवीन तालवाद्यो अभ्यासण्याचा केलेला प्रयत्न या बळावर त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. या ‘ताल’प्रवासातील चढ-उतार, कडू-गोड अनुभव आणि त्यातून घडत गेलेला त्यांच्यातील कलावंत समजून घेण्याची संधी आज ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून मिळणार आहे.