मुंबई : रेल्वे स्थानकात आणि लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणाऱ्याला वाकोला पोलिसांनी सांताक्रूझच्या कलिना येथून अटक केली. सूरज जाधव (४०) असे या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी अशाप्रकारे धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत.
पोलीस महासंचालकांच्या कुलाबा येथील कार्यालातील नियंत्रण कक्षात गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक निनावी दूरध्वनी आला होता. मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असून स्फोट घडविण्यात येणार असल्याची माहिती फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने दिली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून शाळा, शासकीय कार्यालये, दूतावास आदींना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या येत होत्या. शुक्रवारी स्वातंत्र्यदिन असल्याने हा दूरध्वनी पोलिसांनी गांभीर्याने घेतला. फोन करणाऱ्या व्यक्तीने ठिकाण सांगितले नव्हते. फक्त मुंबई रेल्वे असा उल्लेख केला होता. त्यामुळे सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
गुरुवारी रात्रभर तपासणी
शुक्रवारी स्वातंत्र्यदिन असल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गुरुवारी रात्रभर सर्व रेल्वेस्थानकांची तपासणी करण्यात आली. रेल्वे पोलिसांबरोबर, गृहरक्षक (होमगार्ड), रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी (आरपीएफ) या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. रेल्वे स्थानकांतील लांबपल्ल्याच्या गाड्या, उपनगरीय रेल्वे, मालगाड्या आदींची तपासणी करण्यात आली. याशिवाय रेल्वे स्थानक परिसर पिंजून काढण्यात आला. रेल्वे स्थानकात रेंगाळणाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.
कलिना येथून अटक
ज्या क्रमांकावरून हा निनावी दूरध्वनी आला होता, त्याचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी तपास सुरू केला. हा फोन वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलिना परिसरातून आला होता. वाकोला पोलिसांनी तपास करून सूरज धर्माजी जाधव (४०) याला ताब्यात घेतले. तो कलिना येथील कोलावरी व्हिलेज परिसरात वास्तव्यास आहे. तो नशेबाज आणि विकृत आहे. पोलीस यंत्रणांना त्रास देण्यासाठी त्याने ही अफवा पसरविणारा दूरध्वनी केल्याची माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी दिली. त्याने यापूर्वीही पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अशा प्रकारचे दूरध्वनी केले होते. याप्रकरणी त्याच्याविरोधात २०२२ मध्ये वाकोला आणि बीकेसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला पुढील तपासासाठी रेल्वेच्या विशेष कृती दलाकडे सोपविण्यात आले आहे.