मुंबई :  पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या १४ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. त्या याचिकांची तपासणी करून संबंधितांना नोटीस बजावण्याबाबत अध्यक्ष निर्णय घेणार आहेत.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी पदावर निवड झाल्यानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची, तर मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यासाठी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा पक्षादेश (व्हिप) भरत गोगावले यांनी काढला होता. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उरलेल्या १६ पैकी आणखी एक आमदार संतोष बांगर हे रविवारी रात्री शिंदेगटात दाखल झाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासह १५ आमदारच उरले होते. विश्वासदर्शक ठरावावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, राजन साळवी, वैभव नाईक आदी १५ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मतदान केले.

विधिमंडळातील कामकाज आटोपल्यानंतर शिंदेगटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश झुगारून शिंदेसरकारच्या विरोधात मतदान केल्याबद्दल आदित्य ठाकरे वगळता सर्व १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका दाखल केली आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्याने त्यांच्याविरोधात याचिका केली नसल्याचे भरत गोगावले यांनी माध्यमांना सांगितले.

शिवसेना आमदार शिंदे गटात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने मतदान करणारे संतोष बांगर यांनी सोमवारी सकाळी मात्र शिंदे गटात प्रवेश केला. तसेच विश्वासदर्शक ठरावावर त्यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले. शिंदे सरकारने  कारवाईचा ‘सूचक’ संदेश दिल्यानेच बांगर हे त्यांच्याबरोबर गेल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.