मुंबई : २०२६ – २७ या शैक्षणिक वर्षामध्ये औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्यास, तसेच प्रवेश वाढीसाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयांना भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेच्या (पीसीआय) संकेतस्थळावर ६ ऑक्टोबरपासून अर्ज करता येणार आहे. औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था सुरू करण्यापूर्वी भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेची (पीसीआय) मान्यता घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या संस्थांना ६ ऑक्टोबरपासून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी किंवा जागांमध्ये वाढ करण्यासाठी संबंधित संस्थांना ६ ऑक्टोबरपासून पीसीआयच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. ही सुविधा पुढील वर्षभर उपलब्ध असणार आहे.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या संस्थांना त्यांची मान्यता वाढविण्यासाठी ६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान अर्ज करता येणार आहे. मात्र त्यानंतर मान्यता वाढविण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही.नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात प्रथमच अर्ज करणाऱ्या संस्थांना २०२६-२७ शैक्षणिक सत्रासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत एसआयएफ, पीईआरसी आणि वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे.

पहिल्यांदाच अर्ज करणाऱ्या नवीन संस्थांनी, तसेच नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी किंवा प्रवेशवाढीसाठी मान्यता मिळवू इच्छिणाऱ्या विद्यमान संस्थांनी २०२६-२०२७ या शैक्षणिक सत्रासाठी विचारात घेण्याकरीता ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आवश्यक वैधानिक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मात्र या कालावधीत कागदपत्रे सादर न करणाऱ्या संस्थेचा अर्ज २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी विचारात घेण्यात येईल. जोपर्यंत ही कागदपत्रे सादर केली जाणार नाही, तोपर्यंत २०२६-२०२७ च्या प्रवेशासाठी अर्जावर प्रक्रिया केली जाणार नसल्याचे पीसीआयकडू स्पष्ट करण्यात आले आहे.