मुंबई : बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण(फोन टॅिपग) प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात  कुलाबा पोलिसांनी मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. ७०० पानांच्या या आरोपपत्रात शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह २० सरकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबही असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना शुक्ला यांनी एकनाथ खडसे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या दूरध्वनीचे बेकायदा अभिवेक्षण केल्याचा  आरोप आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचाही जबाब नोंदवला होता. याशिवाय ६ सरकारी अधिकाऱ्यांचे जबाब कलम १६४ अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत.

केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या शुक्ला या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त आहेत. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण(फोन टॅपिंग) केल्याचा आरोप आहे. याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती.

याच समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केल्यानंतर कुलाबा पोलिसांनी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भादंवि कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने यापूर्वी बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण आणि पोलिसांच्या बदल्यांचे गोपनीय दस्तऐवज फोडल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करुन काहींचे जबाबही नोंदवले होते.