मुंबई : देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर झाले पाहिजे, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आग्रह आहे. मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्ज रोखे बाजारात आणले आहेत. अशा प्रकारे भांडवली बाजारातून निधी उभारणारी पिंपरी – चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

पिंपरी – चिंचवड महापालिकेचे हरित कर्ज रोखे मुंबई शेअर बाजारात सुचिबद्धता (लिस्टिंग) प्रक्रिया बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील बीएसई आंतरराष्ट्रीय सभागृहात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, प्रधान सचिव डॉ. के गोविंदराज, बॅाम्बे स्टॅाक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरम रामामूर्ती आदी उपस्थित होते.

पिंपरी – चिंचवड महापालिकेने बाजारात आणलेल्या हरित कर्ज रोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांनी भरभरून गुंतवणूक केली. कर्ज रोखे बाजारात आणल्यानंतर काही मिनिटांतच शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे करण्यात आली. त्यानंतर पाच पटीने गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली. या वरून गुंतवणूकदारांचा हरित कर्ज रोख्यांवरील विश्वास दिसतो. या रोख्यांचा कालावधी पाच वर्षांचा असून, त्यासाठी ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्ज रोख्यांतून हरीत विकास

शेअर बाजारात कर्ज रोखे सुचिबद्ध करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. भांडवली बाजाराच्या अटी शर्तींची पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या निधीतून पायाभूत सोयी सुविधांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. ही कामेही हरित पद्धतीची, पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाची असणार आहेत. केंद्र शासनाकडूनही हरित कर्ज रोखे जारी केल्यामुळे २० कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही महापालिकेला प्राप्त झाले आहे. हरित कर्ज रोख्यांद्वारे महापालिकेने २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या (बीएसई) इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हरित कर्ज रोखे बाजारात आणल्यानंतर केवळ एका मिनिटात शंभर कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला, तर एकूण ५१३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच रोख्याला ५.१३ पट अधिक मागणी मिळाली. हरित कर्ज रोख्यांना क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त संस्थाकडून ‘एए १’ पतमानांकन प्राप्त झाले आहे. हरित कर्ज रोख्यातून उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक दरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प या दोन महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे.