मुंबई: दहिसरमधील घरटनपाडा परिसरात कचऱ्यात एक पिस्तुल आढळले. लहान मुलाने खेळताना या पिस्तुलाचा चाप ओढल्याने एक गोळी सुटली. मात्र या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. दहिसर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दहिसर (पूर्व) येथील घरटनपाडा २ येथील साईकृपा चाळीजवळ शुक्रवारी संध्याकाळी काही लहान मुले खेळत होती. संध्याकाळी ७ च्या सुमारास एका मुलाला कचऱ्यात एक पिस्तुल सापडले. त्याला ते खेळण्यातील पिस्तुल वाटले. त्यामुळे कुतूहलापोटी त्याने ते हातात घेतले होते. मुलाच्या हातून चुकून पिस्तुलाचा चाप ओढला गेल्याने एक गोळी सुटली. ही गोळी जमिनीच्या दिशेने गेल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा, दहशतवाद विरोधी कक्षाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घाबरून मुलाने पिस्तुल त्याच जागी टाकून दिले. पोलिसांनी पंचनामा करून पिस्तुल ताब्यात घेतले. हे पिस्तुल इटालियन बनावटीचे असून त्यात चार काडतुसे होती. या पिस्तुलाची किंमत साधारण दीड लाख रुपये असल्याची माहिती दहिसर पोलिसांनी दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या हत्यार कायद्याच्या कलम ३ आणि २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर मुलगा १२ वर्षांचा असून त्याला ते पिस्तुल खेळण्यातील वाटल्याने त्याने ते हातात घेतले होते. चुकून त्याच्याकडून चाप ओढला गेल्याने गोळी सुटली, अशी माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली. परिसरातील कचऱ्यात पिस्तुल कुणी टाकले त्याचा पोलीस शोध घेत आहेत.