मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील मातीच्या प्रश्नावर गेल्या सात – आठ वर्षांत तोडगा काढण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणांना आता प्रत्यक्ष मैदानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंनीच पत्र पाठवले आहे. संपूर्ण मैदानाची दुरुस्ती, सपाटीकरण आणि देखभाल करावी, अशी मागणी या खेळाडूंनी मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिका, आयआयटीचे तज्ज्ञ, एमपीसीबीचे सदस्य तसेच शिवाजी पार्कचे रहिवासी यांची रविवारी बैठक होणार आहे. राजकीय पक्षांच्या सभांनी गाजलेले शिवाजी महाराज मैदान गेल्या काही वर्षापासून धुळीच्या समस्येमुळे चर्चेत आले आहे. खेळाडूंसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या मैदानातील उडणारी लाल माती येथील रहिवासी व खेळाडूंसाठी त्रासदायक ठरत आहे. गेल्या आठ – दहा वर्षांपासून धुळीचा प्रश्न सोडवण्यासाठी रहिवाशांचे आंदोलन सुरू असून अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मैदानातील मातीचा मुद्दा तापला होता. दरवर्षी हिवाळा आला की मैदानातील माती वाऱ्याबरोबर उडते. त्यामुळे हिवाळ्याच्या तोंडावर हा मुद्दा अधिकच चर्चेत येतो. आतापर्यंत रहिवाशांनी अनेकदा आंदोलने करूनही या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्यामुळे आता परळ, दादर, माहीम परिसरातून या मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंनीच एक पत्र मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाला पाठवले आहे. मैदानात विविध क्लबच्या आठ खेळपट्ट्या आहेत. हे क्लब आपापल्या परिसराची देखभाल व स्वच्छता करतात. मात्र त्याव्यतिरिक्त मैदानाचा परिसर दुर्लक्षितच असतो.

या आहेत खेळाडूंच्या मागण्या

छत्रपती शिवाजी माहाराज पार्क हे केवळ एक खेळाचे मैदान नसून मुंबईच्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. हे मैदान तरुण खेळाडूंच्या नियमित सरावाचा अविभाज्य भाग आहे. मात्र मैदानाचा पृष्ठभाग खराब झाल्यामुळे सराव करताना खेळाडूंना अडचणी येतात. तसेच धूळ उडते. अस्वच्छतेमुळे आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचे खेळाडूंनी पत्रात म्हटले आहे. मैदानाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी नियमित स्वच्छता व देखभाल उपक्रम राबवावेत, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची व्यवस्था करावी, संपूर्ण मैदानाचे सपाटीकरण करावे आदी मागण्या पत्रात करण्यात आल्याची माहिती येथे नियमित येणारे खेळाडू समीर गायकवाड यांनी दिली.

रविवारी होणार निर्णायक बैठक

मैदानातील धुळीबाबत रविवारी सकाळी सर्व संबंधितांची बैठक होणार आहे. आयआयटीचे तज्ज्ञ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी, रहिवासी संघटनेचे प्रतिनिधि या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. माती उडू नये म्हणून मैदानात लावण्यात आलेल्या गवताचीही तज्ज्ञ मंडळी पाहणी करणार आहेत. त्याबाबत करण्यात येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.

माती काढण्याच्या मागणीवर रहिवासी ठाम

मुंबई महापालिकेने २०१५ मध्ये मैदानातील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी हिरव्या गवताची पेरणी केली होती. गवत तयार करण्यासाठी या मैदानावर मोठ्या प्रमाणावर माती टाकण्यात आली होती. पण हिरवळीचा प्रयोग फसल्यानंतर आता उरलेली माती वाऱ्याबरोबर उडत असून धुळीचा त्रास वाढल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. आयआयटीच्या तज्ज्ञांनी माती काढण्यास सांगितले होते. मात्र सगळ्या यंत्रणा माती काढण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप रहिवासी संघटनेचे प्रकाश बेलवडे यांनी केला आहे. माती काढण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असेही त्यांनी सांगितले.