ठेवीदारांचे आंदोलन व्यापक; पीएमसी बँक ठेवीदारांचा आझाद मैदानात निषेध
मुंबई : ‘पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’च्या ठेवीदारांबरोबरच सिटी को-ऑपरेटिव्ह बँक, सारस्वत बँक, पेण को-ऑपरेटिव्ह बँक आदींच्या ठेवीदारांना एका व्यासपीठावर आणून ठेवीदारांच्या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. पीएमसीच्या ठेवीदारांनी मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन केले. त्या वेळी ठेवीदारांचे आंदोलन व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई आणि नवी मुंबईतील शीखधर्मीयांची सर्वोच्च संस्था आणि पीएमसी बँक डिपोझिर्ट्स असोसिएशनने या आंदोलनाचे आयोजन केले होते. सुमारे ५ हजार ठेवीदारांनी आंदोलनात सहभाग नोंदवत रिझव्र्ह बँकेविरोधात रोष व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान पीएमसी बँकेच्या १० सदस्यीय प्रतिनिधी मंडळाने रिझव्र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. खातेदारांच्या ठेवींबाबत २७ ऑक्टोबपर्यंत रिझव्र्ह बँक ठोस भूमिका जाहीर करेल, असे आश्वासन रिझव्र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती पीएमसी बँक डिपोझिर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास उटगी यांनी दिली.
मात्र रिझव्र्ह बँकेने खातेदारांच्या ठेवी सुरक्षित करण्याबाबत ३० ऑक्टोबपर्यंत ठोस निर्णय जाहीर केला नाही, तर ठेवीदार मोठे आंदोलन उभे करतील, असा इशाराही उटगी यांनी या वेळी रिझव्र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना दिला. तसेच हे आंदोलन व्यापक पातळीवर उभे करून यामध्ये सिटी को-ऑपरेटिव्ह बँक, सारस्वत बँक, पेण को-ऑपरेटिव्ह बँक आदींच्या ठेवीदारांना एका व्यासपीठावर आणून आंदोलन उभारले जाणार आहे, अशी माहिती उटगी यांनी दिली.
रिझव्र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी १९ मुद्दय़ांवर चर्चा झाली आहे. त्यामध्ये पीएमसी बँकेचे आर्थिकदृष्टय़ा सक्षम अशा स्टेट बँकेमध्ये विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहे. रिझव्र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे जर ३० ऑक्टोबपर्यंत मार्ग काढण्यात आला नाही, तर विविध पद्धतीने मोठय़ा प्रमाणात आंदोलन उभारले जाणार आहे, असा इशाराही उटगी यांनी दिला आहे.
रस्त्यावरील लढाईबरोबर आंदोलकांनी न्यायालयातही दाद मागितली असून मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहे. पीएमसी बँक डिपाझिर्ट्स असोसिएशन यांच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तर गुरुनानक विद्यालय सायन-कोळीवाडा यांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल करत न्याय देण्याची विनंती केली. या शाळेच्या मोठय़ा ठेवी पीएमसी बँकेत अडकल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या अडचणीत वाढ झाली आहे, तर इतर तीन ठेवीदारांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.