Mumbai Women Teacher Sexuall Assultes Student: मुंबईत एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या प्रसिद्ध शाळेतील ४० वर्षीय शिक्षिकेला जामीन मंजूर करताना विशेष पोक्सो न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले की, पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट होत आहे की, विद्यार्थी आणि शिक्षिकेमध्ये संमतीने संबंध होते.
पीडित विद्यार्थ्याचे वय १७ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश सबिना ए. मलिक म्हणाल्या, “आरोपी शिक्षिकेने शाळेतून राजीनामा दिल्याने, शिक्षिका आणि विद्यार्थी समोरासमोर येण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे शिक्षिकेचा विद्यार्थ्यावर प्रभाव पडण्याचे कारण नाही.” न्यायाधीशांनी पुढे नमूद केले की, खटला सुरू होण्यास वेळ लागणार असून, या कालावधीत आरोपीला तुरुंगात ठेवून काहीही फलदायी होणार नाही. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
यावेळी पीडित विद्यार्थ्याच्या वकिलांनी आरोपी शिक्षिकेच्या जामीनाला विरोध केला आणि असे म्हटले की, जर शिक्षिकेला जामिनावर सोडण्यात आले, तर ती पुन्हा पीडित विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण करण्याचे, धमकावण्याचे, हानी पोहोचवण्याचे प्रयत्न करेल. तसेच ती पुराव्यांशी छेडछाड देखील करेल.
यावर न्यायमूर्ती म्हणाल्या, “पीडित विद्यार्थ्याला जर काही संभाव्य धोका असेल, तर आवश्यक अटी आणि शर्ती लादून तो कमी करता येईल. आरोपीवर कडक अटी लादून फिर्यादीची भीती कमी करता येईल.”
न्यायमूर्तींनी आरोपी शिक्षिकेला जामीन मंजूर करताना काही अटी लादत सांगितले की, आरोपीने पीडितेला कोणत्याही प्रकारे भेटू नये, संपर्क साधू नये किंवा धमकी देऊ नये. कोणत्याही साक्षीदाराला किंवा पीडित विद्यार्थ्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भेटण्यास आणि धमकी देण्यास मनाई आहे.
न्यायमूर्तींनी पुढे नमूद केले की, यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास आरोपी शिक्षिकेचा जामीन तात्काळ रद्द केला जाईल.
आरोपी शिक्षिका दोन अल्पवयीन मुलांची आई आहे. तिने एप्रिल २०२४ मध्ये शाळेतून राजीनामा दिला होता. तिने असा दावा केला की, तिने मुलापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. तिने असाही युक्तिवाद केला की, विद्यार्थी १८ वर्षांचा होण्याच्या काही महिने आधी एफआयआर नोंदवण्यात आला होता. याचा अर्थ असा की, प्रौढ झाल्यानंतर त्याला संबंध सुरू ठेवण्यापासून रोखण्यासाठी तक्रार करण्याची वेळ आली होती.