मुंबई : गर्दीच्या वेळी बेस्ट बसमधील प्रवाशांचे सामान चोरणाऱ्या एका सराईत चोराला समता नगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. सुरेश पवार असे या आरोपीचे नाव असून आरोपीच्या अटकेमुळे बसमध्ये चोरीच्या १० गुन्ह्यांची उकल झाली आहे.

कांदिवलीत राहणारी गुलअफशा शेख (२६) ९ नोव्हेंबर २०२५ रोजी गोरेगाव – विक्रोळी बस आगारदरम्यान बेस्ट बसने (क्रमांक ए ४७८) प्रवास करीत होती. दुपारी १२ ते १.३० च्या सुमारास प्रवास करत असताना अज्ञात चोराने गर्दीचा फायदा घेऊन तिची पर्स लंपास केली. तिच्या पर्समध्ये दोन मंगळसूत्रे, चांदिचे दागिने असा सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक राहुल वाळुंजकर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास केला. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण आणि इतर तांत्रिक तपास करून पोलिसांनी सुरेश पवारला (५०) अटक केली. तो मालाडच्या अप्पापाडा येथील रहिवासी आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार असून बसमधील गर्दीचा फायदा घेऊन तो प्रवाशांचे सामान लंपास करीत होता. अशाप्रकारे त्याने केलेल्या १० गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे.