भिवंडी येथील शांतीनगर-पिराणीपाडा परिसरात ताडी विक्री करणारा दुकान मालक आणि भिवंडी पोलिसांच्या मारहाणीत एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी मृत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तीन पोलीस आणि अन्य दोन अशा पाच जणांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत पोलिसांना आरोपी करण्यात आल्याने या प्रकरणाचा तपास पुणे सीआयडीकडे देण्यात आला आहे. त्यामुळे शांतीनगर पोलीस अडचणीत आले आहेत.
सगीर फकीर कुरेशी (२०), असे यातील मृत पावलेल्या तरूणाचे नाव असून तो ताडीच्या दुकानात गेला होता. किरकोळ कारणावरून त्याचा ताडीविक्रेता गोपाल शेट्टी याच्यासोबत वाद झाला. त्यानंतर गोपाल आणि त्याचा मित्र जाकीर नजीर शेख या दोघांनी सगीरला मारहाण केली. तसेच त्याला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या केएनजी पोलीस चौकीत नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी तेथील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो बेशुद्ध झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी सगीरच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार तीन पोलीसांसह पाच जणांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. गुन्हा दाखल झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे मात्र बुधवारी रात्री उशीरापर्यंत मिळू शकली नाहीत. तसेच शांतीनगर पोलिसांकडून या संबंधीचा गुन्हा दाखल झाला नसल्याचा दावा करण्यात येत होता. एकंदरीत आपल्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी शांतीनगर पोलिसांचा आटापिटा सुरू असल्याचे दिसून आले.
नातेवाईकांच्या मागणीनुसार, पोलिसांनी सगीरचा मृतदेह जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. हा मृत्यू पोलीस कोठडी झाला असल्याने या प्रकरणाचा तपास पुणे सीआयडीकडे देण्यात आला असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.