मुंबई : आगीची दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचताना अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांच्या मालकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे अरुंद, चिंचोळ्या रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांना भविष्यात मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध योजना, प्रकल्प आदींची तयारी व उपाययोजना, तसेच त्यातील अडचणी आदींबाबत मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि वनस्पती उद्यान येथे बुधवारी पार पडली. यावेळी भूषण गगराणी यांनी वरील निर्देश दिले.

कोणतीही दुर्घटना असली तरी तीन मिनिटांच्या आत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचतात अशी एकेकाळी अग्निशमन दलाची ख्याती होती. मात्र गेल्या काही वर्षात मुंबईतील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. रस्त्यावर कुठेही कशाही पद्धतीने उभी केलेली वाहने आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे बचावकार्याला उशीर होतो. दुर्घटना घडल्यानंतर पहिल्या काही मिनिटांमध्ये जी मदत मिळायला हवी ती मिळत नाही. त्यामुळे बचावकार्यात नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा वेळ ‘गोल्डन अवर’ हुकतो. आतापर्यंत पालिकेने यावर अनेक उपाययोजना केल्या. मात्र तरीही वाहतूक कोंडीमध्ये गाड्या अडकून पडतात. अनेकदा अरुंद गल्ल्यांमध्ये आग लागल्यास आधी तेथे उभ्या केलेल्या गाड्या बाहेर काढाव्या लागतात. त्यामध्येही वेळ जातो, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडथळा ठरणाऱ्या वाहनांच्या मालकांविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

वाहतूक कोंडी आणि अग्निशमन दलावर ठपका

मुंबईत अनेक विभागांमध्ये चिंचोळ्या गल्ल्या, दाटीवाटीच्या वस्त्या, अरुंद रस्ते, जास्त वाहतूक कोंडीचे मार्ग आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी आग लागणे, इमारत पडणे अशा दुर्घटना घडल्यास अनेकदा अग्निशमन दलाच्या अवाढव्य गाड्या तेथे वेळेवर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे यावर उपाय म्हणून मुंबई अग्निशमन दलाने काही वर्षांपूर्वी अरुंद ठिकाणी पोहोचू शकतील अशी लहान आकाराची जलद प्रतिसाद वाहने घेतली होती. तसेच अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवण्यात आली. लघु अग्निशमन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मात्र एखाद्या ठिकाणी आग मोठी लागल्यास जास्त मोठा ताफा मागवावा लागतो, पाण्याचे टॅंकर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे शिडी वाहन अशी वाहने मागवावी लागतात. ती वाहने वेळीच पोहोचू न शकल्यामुळे बचावकार्याला उशीर होतो. त्यामुळे अग्निशमन दलावर ठपका ठेवला जातो. या पार्श्वभूमीवर भूषण गगराणी यांनी कडक पावले उचलली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेवारस वाहनेही हटवा

मुंबईतील सुलभ वाहतूक आणि नागरिकांच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने आणि भंगार / टाकाऊ साहित्य तत्काळ हटवावे, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. वर्दळीची ठिकाणे, रेल्वे स्थानक परिसर हे फेरीवाला मुक्त करण्यासाठी संबंधित विभाग कार्यालय (वॉर्ड) वगळता इतर विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने विशेष मोहीम राबवावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.