मुंबई: नामांकित कंपनीच्या नावाने संगणकाचे बनावट साहित्य तयार करून त्याची विक्री करणाऱ्या चेंबूरमधील एका गोदामावर टिळकनगर पोलिसांनी मंगळवारी छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी गोदामामधून ८३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी व्यवस्थापक आणि एका टेम्पो चालकाला अटक केली.
चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावरील हनुमान चाळ परिसरातील एका गोदामातून मोठ्या प्रमाणात नामांकीत कंपन्यांचे प्रिंटर आणि इतर साहित्याची विक्री करण्यात येत होती. याबाबत संबंधित कंपनीला माहिती मिळताच त्यांनी टिळकनगर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ एक पथक तयार केले.
या पथकाने परिसरात पाहणी केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी गोदामावर छापा घातला. यावेळी तेथे विविध नामांकित कंपन्यांचे ८३ लाख रुपये किमतीचे प्रिंटर आणि इतर बनावट साहित्य पोलिसांना सापडले. याप्रकरणी गोदामात व्यवस्थापक म्हणून काम करणारा नारायण वाव्हिया आणि टेम्पोचालक पप्पूकुमार पाल या दोघांना पोलिसांनी अटक केली.