मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात आलेल्या दोन पुनर्वसित इमारतीतील ५५६ घरांचा ताबा मागील कित्येक दिवसांपासून रखडला आहे. ताबा देण्यासाठी आतापर्यंत म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून देण्यात आलेले मुहूर्त चुकले असून आता नव्याने देण्यात आलेला १५ मेचा मुहूर्तही चुकला आहे. पुनर्वसित इमारतींना अद्यापही भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रिया सुरू करण्यास विलंब होत आहे. आता भोगवटा प्रमाणपत्र मिळेपर्यंत वरळीतील रहिवाशांना घराच्या ताब्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लावला जात आहे. त्यानुसार वरळीत पुनर्वसित इमारतींची कामे वेगात सुरू आहेत. १२ पुनर्वसित इमारतींपैकी दोन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीत ५५६ घरांचा समावेश आहे. इमारतींचे काम पूर्ण झाल्याने या घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेत मुंबई मंडळाने भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, याआधी या घरांच्या ताब्यासाठी डिसेंबर २०२४, मार्च २०२५, एप्रिल २०२५ असे मुहूर्त निश्चित करण्यात आले होते. पण हे सर्व मुहूर्त चुकले असून घराचा ताबा रखडला आहे. तर काम अपूर्ण असताना मंडळाकडून तारखांवर तारखा जाहीर करून त्या चुकविल्या जात असल्याने वरळीतील रहिवाशांमध्ये नाराजी आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत म्हाडाने १५ मेपर्यंत वरळीतील ५५६ घरांचा ताबा दिला जाईल, असे आश्वासित केले होते. मात्र आता हा मुहूर्तही चुकला आहे. महत्त्वाचे म्हणजे म्हाडाने आपल्या १०० दिवसाच्या कृती आराखड्यातही या घरांचा ताबा देण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र हे लक्ष्य मंडळाला पूर्ण करता आलेले नाही.
मुंबई महानगरपालिकेने लँड अंडर कन्स्ट्रक्शन करापोटी ४५ कोटी रुपय कराची आकारणी केली आहे. करमाफी मिळावी यासाठी म्हाडाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. मात्र त्यावर निर्णय घेण्यात न आल्यामुळे मंडळाने कर अदा केलेला नाही. परिणामी पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने भोगवटा प्रमाणपत्र प्रक्रिया अडकली होती. त्यामुळे म्हाडाने राज्य सरकारचा निर्णय येईपर्यंत कराच्या १० टक्के रक्कम जमा करून घेऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी पालिकेकडे केली होती. ही मागणी पालिकेने मान्य केली असून १० टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. तर भोगवटा प्रमाणपत्रासाठी मंडळाने अर्जही केला आहे. मात्र अद्याप भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा रखडल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. लवकरात लवकर भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कामे पूर्ण केल्यानंतरच ताबा
म्हाडाकडून आतापर्यंत घरांच्या ताब्यासाठी तीन-चार तारखा देण्यात आल्या आहेत. मात्र त्या सगळ्या तारखा चुकल्या असून या तारखांमुळे आम्ही वैतागलो आहोत. मूळात ५५६ घरांचा समावेश असलेल्या इमारतींमधील काही कामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. वीज, पाणी इत्यादी सुविधा अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे या सर्व सुविधा उपलब्ध करून, कामे पूर्ण करून त्यानंतरच म्हाडाने ताब्यासाठीचा मुहूर्त जाहीर करावा. उगाच तारखा देऊन रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. बजरंग काळे, रहिवाशी, वरळी बीडीडी