मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळीतील बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार या पुनर्विकासाअंतर्गत १५५९३ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात येणाऱ्या ३३ पुनर्वसित इमारतींपैकी १२ इमारतींची कामे सध्या सुरू आहेत. त्यापैकी दोन इमारतींची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्यात ५५० घरांचा समावेश आहे. तेव्हा या ५५० घरांचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करून डिसेंबरअखेर घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

ना.म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या तिन्ही प्रकल्पांनी वेग घेतला असून वरळीतील दोन पुनर्वसित इमारती आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. वरळीतील १५५९३ रहिवाशांसाठी बहुमजली ३३ इमारती प्रस्तावित आहेत. यातील १२ इमारतींची कामे सध्या सुरू आहेत. त्यानुसार १२ पैकी ५५० घरांचा समावेश असलेल्या दोन इमारतींचे ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. आता केवळ अंतर्गत कामे शिल्लक असून त्यांना वेग देण्यात आला असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शिल्लक कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करून पुढील कार्यवाही करून या घरांचा ताबा डिसेंबरअखेरीस देण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. ५०० चौ फुटाच्या उत्तुंग इमारतीतील घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने ही बाब वरळीकरांना दिलासा देणारी आहे.

हेही वाचा – भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट

हेही वाचा – राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

वरळीतील जे रहिवासी या दोन इमारतींतील घरांसाठी संगणकीय सोडतीद्वारे पात्र ठरले आहेत, त्या पात्र रहिवाशांना या घरांचा ताबा दिला जाणार आहे. तर दुसरीकडे उर्वरित इमारतींच्या कामाला वेग देत या इमारतीतील घरांचा ताबाही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न मंडळाचा असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी उर्वरित २१ इमारतींची कामे सुरू करण्याच्या दृष्टीने चाळी रिकाम्या करून घेणे, चाळींचे पाडकाम करून इमारतींच्या कामाला सुरुवात करण्याच्या कामालाही वेग दिला जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.