मुंबई: ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला उपलब्ध होणाऱ्या विक्रीयोग्य घटकातील भूखंडांची (चटई क्षेत्र निर्देशांकासह) विक्री करण्यात येण्याची शक्यता आहे. बीडीडी पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाला निधीची चणचण भासू लागल्याने विक्रीयोग्य घटकातील उपलब्ध भूखंडांवर सदनिका बांधून विकण्यापेक्षा भूखंड विकणे योग्य पर्याय होईल का याची व्यवहार्यता तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विक्री व्यवहार सल्लागाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. येत्या काही दिवसांतच सल्लागाराच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत १५ हजारांहून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या पुनर्विकासाचे काम सध्या वेगात सुरू आहे. तिन्ही बीडीडी चाळींत पुनर्वसित इमारती बांधण्यात येत आहेत. या पुनर्विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागत आहे. प्रकल्पाच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई मंडळाला निधीची चणचण भासू लागली आहे. दरम्यान, बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत विक्री घटकातील भूखंडांवर घरे बांधून त्यांची बाजारभावाने विक्री करून प्रकल्पाचा खर्च आणि नफा मिळविण्यात येणार होता. मात्र, पुनर्वसित इमारतींचे काम सुरू असतानाच मंडळाला निधीची गरज भासू लागली आहे. विक्रीयोग्य घटकातील भूखंडांवर घरे बांधण्यासाठी निधी नसून ही घरे बांधून त्यांची विक्री करून रक्कम मिळण्यास मोठा कालावधी लागणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेत विक्रीयोग्य घटकातील भूखंडांची चटई क्षेत्र निर्देशांकासह लिलाव, विक्री करण्याची संकल्पना पुढे आली आहे.

हेही वाचा >>>विदेशी चलनाचे आमिष दाखवून फसवणूक; दोघांना अटक

म्हाडाच्या या संकल्पनेनुसार, विक्रीयोग्य घटकातील भूखंडावर सदनिका बांधणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होईल की चटई क्षेत्र निर्देशांक विक्री आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल , याचा अभ्यास करण्यासाठी विक्री व्यवहार सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. विक्रीयोग्य घटकातील चटई क्षेत्र निर्देशांक विक्री, सदनिका विक्री वा हे दोन्ही पर्याय एकत्रित व्यवहार्य ठरतील का यासंबंधी विक्री व्यवहार सल्लागाराकडून प्राप्त होणाऱ्या अहवालनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी मुंबई मंडळाने निविदा मागविल्या होत्या. आठवडाभरापूर्वी या निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. येत्या आठवडाभरात निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. याला जयस्वाल यांनी दुजोरा दिला. नियुक्तीनंतर सल्लागाराकडून निश्चित कालावधीत अहवाल तयार करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर विक्रीयोग्य घटकातील भूखंडांची विक्री करायची की सदनिका बांधून विकायच्या वा भूखंडविक्री आणि सदनिका विक्री दोन्ही पर्याय निवडायचे यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पण म्हाडाचा कल हा भूखंड विक्रीकडेच असल्याची चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन कंपन्यांच्या निविदा

विक्री व्यवहार सल्लागारासाठी मंडळाकडे दोन निविदा सादर झाल्या आहेत. यातील एक निविदा सीबीआरईची असून दुसरी निविदा अॅनरॉक कंपनीची आहे. या दोन्ही कंपन्यांची छाननी सुरू असून लवकरच निविदा अंतिम होईल, अशी माहिती मुंबई मंडळाकडून देण्यात आली.