मुंबई : देशातील आघाडीच्या दंत महाविद्यालयामध्ये नायर दंत महाविद्यालयाचा समावेश असून देशभरातील विद्यार्थ्यांचा नायर दंत महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याकडे कल असतो. मात्र महाविद्यालयामध्ये सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा अभ्यासक्रमाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. त्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने नायर दंत महाविद्यालयाने प्रयत्न सुरू केले आहेत.
पान, तंबाखू, गुटखा, सिगारेट, सुपारी, चुना आदी खाल्ल्याने नागरिकांचे मौखिक आरोग्य बिघडते. अनेकांना मुख कर्करोग होतो. यामुळे संबंधित व्यक्तीच्या तोंडातील त्वचा कडक होऊन हळूहळू त्याचे ताेंड उघडणे बंद होते. अशा व्यक्तींवर सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागातर्फे उपचार केले जातात. नायर दंत महाविद्यालयात सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा पदवी अभ्यासक्रम शिकविला जातो. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रम नसल्याने विद्यार्थ्यांना अन्य महाविद्यालयात जावे लागते. त्यामुळे दंत रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाहीत. रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत यासाठी महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले आहेत.
अभ्यासक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही पहिला टप्पा पूर्ण केला आहे. आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर भारतीय दंत परिषदेकडे अभ्यासक्रमाला मान्यता मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. परिषदेने मान्यता दिल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी माहिती नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.