मुंबई : पंढरपूर विकासासाठी ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. तसेच गर्दी होणाऱ्या राज्यातील मंदिरे व देवस्थानांचे डिजिटल मॅपिंग करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले असून त्याद्वारे भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा देणे शक्य होईल.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगर परिषदेस वितरित करावा, असे निर्देशही शिंदे यांनी बैठकीत दिले. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सचिन शेट्टी, सुभाष देशमुख, रणजीत सिंह मोहिते पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.
पंढरपूर मंदिर विकास आराखडय़ात ७३ कोटी ८० लाख रुपयांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचे सादरीकरण पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. या आराखडय़ानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे. जतन आणि संवर्धन कामांमध्ये अनियोजित अनावश्यक जोडण्या काढणे, पाणी गळती रोखणे, दगडी बांधकाम आवश्यकतेनुसार दुरुस्त करणे, मंदिर परिसरातील दीपमाळांची पुनर्बाधणी करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.
बैठकीत ३६८ कोटी ७१ लाख रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाबाबत चर्चा झाली. वाहनतळ, रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक त्या भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली. प्रस्तावित आराखडय़ामध्ये वाहनतळ, पाणीपुरवठा, रस्ते विकास, शौचालय निर्मिती, हत्ती तलाव उद्यानांचा विकास, व्यापारी केंद्र, भक्त निवास, चौक सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे.