मुंबई : मुंबई विद्यापीठाने पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाच्या तृतीय सत्र परीक्षेचा निकाल तब्बल ११० दिवसांनंतर अलीकडेच जाहीर केला. मात्र निकाल विलंबाची ही परंपरा खंडित न होता आता पदव्युत्तर विधी शाखेचा उन्हाळी सत्राअंतर्गतच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल दोन महिन्यांनतरही जाहीर झालेला नाही. कोणत्याही परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत जाहीर होणे अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठाकडून विविध परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रकच विस्कळीत झाले आहे.

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ उन्हाळी सत्राअंतर्गत पदव्युत्तर विधी शाखेची (दोन वर्षीय अभ्यासक्रम) द्वितीय सत्र परीक्षा २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षा संपून दोन महिने झाले तरीही विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान,‘पदव्युत्तर विधि शाखा (उन्हाळी सत्र २०२३) द्वितीय सत्र परीक्षेचे मूल्यांकन पूर्ण झाले असून निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले.

हेही वाचा >>>कोकण रेल्वे मार्गावर अडीच तासांचा मेगाब्लॉक

अलीकडेच राजभवन येथे पार पडलेल्या कुलगुरू संयुक्त मंडळाच्या बैठकीत, ‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधींमध्ये अडचणी येऊ नयेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करावेत आणि परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत’, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल रमेश बैस यांनी कुलगुरूंना दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया अधांतरित

करोनामुळे आधीच शैक्षणिक क्षेत्र कोलमडले असून प्रवेश प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. परिणामी निकाल जाहीर करण्यातही सातत्याने विलंब होत आहे. मी शैक्षणिक वर्ष २०२२-२४ या तुकडीतील पदव्युत्तर विधी शाखेचा विद्यार्थी आहे. द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल हा ६० दिवसांनंतरही जाहीर झालेला नाही, त्यामुळे द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया ही ‘तात्पुरती’ झाली असून ‘अंतिम प्रवेश प्रक्रिया’ पूर्ण होणे अद्यापही बाकी आहे. प्रवेश प्रक्रिया ही अधांतरित असल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. परिणामी पुढील शैक्षणिक वाटचाल विस्कळीत होऊन व्यावसायिक संधी मिळविताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका विद्यार्थ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.