मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अनेक ठिकाणचे डांबर उखडल्याचे समोर आले आहे. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. तसेच, अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे. महानगरपालिकेने अनेक वेळा या खड्ड्यांची दुरुस्ती केली. मात्र, पुन्हा पुन्हा रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरवर्षी मुसळधार पाऊस तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे मुंबईत डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका होते. उच्च न्यायालयानेही अनेकदा मुंबई महापालिकेला यावरून फटकारले असून खड्ड्यांच्या तक्रारींसाठी यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यंदा मुंबई महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे ॲप विकसित केले आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ या ॲपद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची माहिती देण्यासाठी एक डॅशबोर्डही तयार करण्यात आला आहे. रोज किती खड्ड्यांच्या तक्रारी आल्या, किती खड्डे बुजवले याची माहिती या डॅशबोर्डवर दिली जाते.
महानगरपालिकेतर्फे गेल्यावर्षी तब्बल १६ हजारांहून अधिक खड्डे बुजवण्यात आले होते व त्यासाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च आला होता. यंदा हा खर्च कमी झाला असून खड्ड्यांची संख्याही कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तसेच, आतापर्यंत डांबरी रस्त्यावरील तब्बल सहा हजाराहून अधिक खड्डे बुजवल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र, असे असले तरीही मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यापैकी एक असलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी छोटे – मोठे खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांची महापालिकेने मे महिन्यात दुरुस्ती केली होती. त्यांनतर काही दिवसात पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले. जूनमध्ये पालिकेने पुन्हा दुरुस्तीचे काम घेतले. त्यांनंतर काहीच दिवसात पुन्हा रस्ता खड्डेमय झाला. त्यांनतर १० जुलै रोजी पुन्हा दुरुस्ती केल्यानांतर रस्त्यावर खड्डे पडले. परिणामी, प्रवास अत्यंत तापदायक ठरत असल्याचे नागरिकां म्हणणे आहे. या भागात खड्ड्यांमुळे दक्षिणेकडील मार्गावर अनेक वेळा वाहतूक कोंडी होते आणि त्यातून पुढे जाण्यासाठी सुमारे अर्धा ते १ तास ताटकळत लोगतो, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या असून अद्यापही समस्या जैसे थेच आहे.
या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात येत आहे.