मुंबई : पवईमधील मुलांच्या ओलीस नाट्य प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनोल वाघमारे यांचा जबाब नोंदविला. वाघमारे यांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झाला होता. वाघमारे याला गोळी झाडण्याचे आदेश देण्यात आले नव्हते असे यापूर्वीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेची माहिती सर्वप्रथम स्टुडियोजवळ असलेल्या चहावाल्याने दिली होती.

रोहित आर्याने गुरूवार, ३० ऑक्टोबर रोजी पवईतील स्टुडियोत १७ मुलांना ओलीस धरले होते. शासनाकडून झालेल्या फसवणुकीमुळे रोहित आर्या वैफल्यग्रस्त झाला होता. न्याय मिळत नसल्याने त्याने मुलांना ओलीस धरून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे एअरगन होती. त्याने ज्वलनशील पदार्थ स्टुडियोत पसरवून स्टुडियोला आग लावण्याची धमकी दिली होती. पवई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी त्याच्याशी दोन तास वाटाघाटी करीत होते. अखेर दोन तासानंतर पोलिसांनी मुलांची सुटका करण्यासाठी स्वच्छतागृहाच्या खिडकीतून आत प्रवेश केला आणि मुलांची सुटका केली. पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी मुलांना ओलीस धरणाऱ्या रोहीत आर्यावर गोळी झाडली होती.

गुन्हे शाखा ८ कडे या प्रकऱणाचा तपास सोपविण्यात आला आहे. त्यांनी शनिवारी अमोल वाघमारे यांचा जबाव नोंदवला. याप्रकरणात गुन्हे शाखेने रात्री उशीरा पर्यंत २२ जणांचे जबाब नोंदवले होते. रोहित आर्याच्या पत्नीबरोबर पोलिसांनी संपर्क साधला होता. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. लवकर तिचा जबाब नोंदविण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

चहावाल्याने पोलिसांना दिली माहिती

पवईच्या महावीर क्लासिक या इमारतीमध्ये आर. ए, स्टुडियो आहे. उमेश तिवारी स्टुडियोमध्ये चहा नाष्टा पुरवत होते. लघुपटासाठी मुलांच्या मुलाखती सुरू असल्याचे समजल्यावर तिवारी यांनी आपल्या मुलाला तिथे पाठवले होते. मात्र त्यांचा मुलगा मुलाखतीत (ऑडिशन) अपात्र ठरला होता.

तिवारी यांनी गुरूवारी गोंधळ सुरू झाल्यावर स्टुडियोत धाव घेतली. स्टुडियोचा दरवाजा बंद होता. पालकांचा आक्रोश सुरू होता. दरम्यान, आर्याने मुलांना ओलीस धरल्याची चित्रफित पाठवली होती. ती चित्रफित पालकांनी तिवारीला दाखवली. यानंतर तिवारीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. मी स्टुडियोच्या खिडकीतून आत बघण्याचा प्रयत्न केला होता. परंतु रोहित आर्याने मला एअरगन दाखवली. माझा मुलगा त्यात नव्हता. परंतु अन्य मुले ओलीस ठेवल्याने मी घाबरल होतो आणि त्यामुळेच मदतीसाठी पोलिसांना बोलावले, असे तिवारी याने शनिवारी माध्यमांना सांगितले.