यंदा पाऊस पडल्याने राज्यातील कृषीपंपांचा वापर जोरात सुरू असून त्यामुळे राज्यातील वीजमागणीने १६ हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. देशात सर्वाधिक वीजमागणी महाराष्ट्रात असून त्यापाठोपाठ मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक असून त्यांची मागणी ११ हजार मेगावॉटच्या आसपास आहे.
आठवडाभरापूर्वी राज्यातील वीजमागणीने साडेपंधरा हजार मेगावॉटचा टप्पा गाठला होता. आता १६ हजार ५७ मेगावॉट इतकी वीजमागणी नोंदवली गेली आहे. यावर्षांतील ही सर्वोच्च वीजमागणी आहे. विशेष म्हणजे यात मुंबईतील वीजमागणीचा समावेश नसतो. मुंबईची वीजमागणी सुमारे तीन हजार मेगावॉटच्या आसपास आहे. ‘महावितरण’ने १५ हजार १७१ मेगावॉट विजेचा पुरवठा यावेळी केला. वीजचोरी आणि पैसे थकवणाऱ्या भागात भारनियमन जाणीवपूर्वक ठेवण्यात आले.