एमआरआयडीसी आणि एमएमआरडीएकडून पुलाची उभारणी 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू यांना जोडणाऱ्या ४.५ किमी लांबीच्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेत प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकावरून दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. प्रथमच अशा नव्या प्रकारे महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमआरआयडीसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मदतीने पूल उभारला जाणार असून मध्य रेल्वेकडून त्याच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे, तर पश्चिम रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा >>> मुंबई : निवृत्ती वेतन कमी, हक्काची देणीही नाहीत; निवृत्तीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचे हाल

एमआरआयडीसी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्ताने अकरा रस्ते, उड्डाणपुल बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये रेल्वे हद्दीतील उड्डाणपूलही असून काही पुलांच्या किरकोळ कामांना सुरुवात झाली आहे. याबरोबरच  एमआरआयडीसी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए)मार्फतही सात उड्डाणपुल बांधण्यात येणार असून त्यात मुंबईतील शिवडी आणि प्रभादेवी-परळ रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचाही समावेश आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी आणि मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकावरील समान असलेला उड्डाणपूल पाडून त्याजागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार  आहे. हा उड्डाणपूल दुमजली असेल, अशी माहीती एका अधिकाऱ्याने दिली. स्थानिक वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन मार्गिकांचा पूल आणि त्यावर प्रत्येकी दोन मार्गिकांचा उन्नत मार्ग असेल.

हेही वाचा >>> निर्णयाने शिंदे गटाला मोठा दिलासा; पर्यायी नावांबाबत दोन्ही गटांमध्ये विचार; उध्दव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

परळ आणि प्रभादेवी रेल्वे स्थानक भागात या मार्गाची लांबी ७४० मीटर, तर रुंदी 24 मीटर असेल. वाहनांसाठी मार्गिका आणि पदपथही असेल. या पुलाच्या रेखाचित्राला एमएमआरडीए तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेनेही मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. पुलाच्या आराखड्याला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाली असून पश्चिम रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. ४.५ किलोमीटर लांबीच्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेला हा उड्डाणपूल जोडला जाणार आहे. दादर येथील टिळक उड्डाणपूल, रे रोड उड्डाणपूल, भायखळा आणि सॅन्डहर्स्ट रोड दरम्यान असलेल्या ब्रिटीशकालिन पुल पाडून त्याऐवजी वांद्रे सागरी सेतूच्या धर्तीवर केबल स्टेड पूल बांधले जाणार आहेत. त्याच्या प्राथमिक कामांना सुरुवात केल्याची माहिती महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनकडून (एमआरआयडीसी)देण्यात आली. जुने उड्डाणपूल न तोडता प्रथम नव्या पुलांची उभारणी केली जाईल. त्यानंतरच जुने उड्डाणपूल पाडण्यात येतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhadevi paral railway station will have a double decker flyover approval plan railway mumbai print news ysh
First published on: 09-10-2022 at 18:37 IST