मुंबई: मणिपूर हा भारताच्या मुकुटातील रत्न असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. या त्यांच्या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांचे हे गौरवोद्गार म्हणजे मणिपूरवासीयांची क्रूर थट्टा असून हिंसाचाराच्या काळात मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरविषयी केलेल्या विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या समाजमाध्यमावर आपली भूमिका मांडत सात प्रश्न उपस्थित केले. जर मणिपूर ‘रत्न’ असेल, तर बिरेन सिंग सरकारने ख्रिश्चन कुकी समाजाचे जातीय शुद्धीकरण का केले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर कुकी समाजाची घरे जाळली जात असताना, महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत असताना पंतप्रधान गप्प का राहिले? तर सामूहिक हत्याकांड, लैंगिक हिंसाचार आणि जाळपोळीची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यास मोदी सरकार नकार का देते? याशिवाय आपल्या देखरेखीखाली होत असलेला रक्तपात थांबवण्यासाठी काहीही न करता मोदी मणिपूरला ‘रत्न’ कसे म्हणू शकतात? मोदी भारताच्या रत्नांशी जर असे वागत असतील तर हे भाजप सरकारच्या नैतिक अध:पतनाचे लक्षण नाही का? जर पंतप्रधानांमध्ये थोडीही नैतिक जबाबदारी असेल तर ते आपल्या कार्यकाळात होत असलेल्या रक्तपातावार गप्प राहूनही ते मणिपूरला रत्न कसे म्हणू शकतात, असा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी मोदींच्या शब्दांत संवेदना नाही तर फक्त ढोंग असल्याची टीका त्यांनी केली.
सरकारकडून या घटनांबाबत ठोस उत्तर आणि कारवाईची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ख्रिश्चन कुकी समाजावर मणिपूरमध्ये अन्याय झाल्याचे वास्तव त्यांनी मांडले. एका ऑडियो टेपमध्ये बिरेन सिंग हेच हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्याचे मत त्यांनी नमूद केले.