मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मुंबईसह राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. दीपोत्सव, फटाक्यांचा दणदणाट, श्रीराम प्रतिमेच्या शोभायात्रा, मिरवणुका आणि रामनामाचा गजर करीत रामभक्तांनी अपूर्व उत्साहात पुन्हा दिवाळीचा जल्लोष साजरा केला.
प्रदीर्घ लढयानंतर अयोध्येत भव्य राममंदिर उभारले गेल्याने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आदी संघटनांच्या नेत्यांनी आणि विविध संस्था, मंदिरे, मंडळे यांनी पुढाकार घेऊन गावागावांत आणि प्रत्येक विभागात विविध उपक्रमांचे आयोजन गेल्या दोन-तीन दिवसांपासून केले आहे. अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृती शेकडो विभागांमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात आल्या होत्या. तेथे मिरवणुका, होमहवन, रामायण व गीतरामायणाचे कार्यक्रम व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई-ठाण्यात काही चित्रपटगृहांसह निवासी सोसायटया, मंदिरे, विभागांमध्ये आणि संस्थांतर्फे मोठया पडद्यांवर सोहळयाचे चित्रीकरण दाखविण्यात येत होते. लक्षावधी रामभक्त प्रतिष्ठापना सोहळयाचे साक्षीदार झाले, यावेळी अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले.
हेही वाचा >>> साताऱ्यात ‘न भूतो न भविष्यते’असा रामोत्सव जल्लोषात संपन्न
प्रदेश भाजपा कार्यालयापुढे अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली असून श्रीरामांचा भव्य कटआऊट लावण्यात आला आहे. तेथे आज मिठाईवाटप करून जल्लोष करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोराडी-नागपूरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पुढाकाराने दादर येथे ८० फूट उंच राममंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांच्याकडून ओशिवरा मेट्रो स्थानकाजवळ ५० फूट राममंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली असून तेथे आतषबाजी करण्यात आली.
हेही वाचा >>> रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात वाजवला ढोल अन्… पाहा VIDEO
बाणगंगा तलाव येथे आयोजन
उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव येथे ‘एक दिवा प्रभू रामचंद्रांसाठी’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तेथे २५ हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करीत महाआरती झाली. आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने शीव
येथील आनंद दळवी मैदानात भव्य रांगोळी च्या माध्यमातून राममंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. गिरगावमध्ये सामूहिक रामरक्षा पठण उपक्रमात हजारो रामभक्तांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
भाजपच्या प्रत्येक आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागात आणि शिंदे गटातील नेत्यांनीही मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली व अन्य ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
जो रामाचा नाही, तो कामाचा नाही- एकनाथ शिंदे अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा डोळयांचे पारणे फेडणारा आहे. या सोहळयावर काही लोकांनी बहिष्कार घातला आणि त्यांना काही लोकांनी साथ दिली आहे. अशा सर्व लोकांना देवाने सद्बुद्धी द्यावी. देशात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत असे सर्व जण जय श्रीरामचा जयघोष करीत आहेत. अशा वेळेस आनंदाने सोहळयात सामील व्हायला पाहिजे; परंतु काही लोक रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. यामुळे सर्वांना सद्बुद्धी द्यावी, असे ते म्हणाले. तसेच जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.