मुंबई : राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट) विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र (ट्रेड सर्टिफिकेट) रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले.ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशन बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सरनाईक म्हणाले की, ‘मल्टी ब्रँड आउटलेट’ सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झालेली आहे.

राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनाधिकृत वाहन विक्री करीत असतात. राज्यात इतर विभागातून, तसेच परराज्यातून नवीन वाहने आणून व्यवसाय प्रमाणपत्र नसताना अनाधिकृतरित्या वाहन विक्री करतात. भविष्यात अशा अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या अधिकृत वाहने विक्रेत्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र रद्द करावेत, असे निर्देश सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले. तसेच कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहील, असा विश्वास सरनाईक यांनी विक्रेत्यांसमोर व्यक्त केला.

एसटीच्या बसस्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ उभारणार

ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनने त्यांच्या सीएसआर निधीतून राज्यभरातील महत्त्वाच्या एसटी बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयीसह ‘हिरकणी कक्ष’ उभारावेत, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशने पहिल्या टप्प्यात ५१ बसस्थानकामध्ये ‘हिरकणी कक्ष’ उभारून देण्याचे आश्वासन दिले.