मुंबई : घटस्फोटासारख्या महत्त्वाच्या सामाजिक विषयावर भाष्य करत ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करीत तिकीट खिडकीवर यशस्वी झाला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘प्रेमाची गोष्ट २’ येत्या २२ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका प्रेमकथेच्या अरेंज मॅरेजची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाची पहिलीवहिली झलक (टीझर) नुकताच प्रदर्शित झाला.

प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास मांडणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अपेक्षाही वाढल्या आहेत. ज्याप्रमाणे ‘प्रेमाची गोष्ट’ने संवेदनशील विषयावर भाष्य करीत मनोरंजन केले, त्याप्रमाणे काही तरी अधिक प्रभावी ‘प्रेमाची गोष्ट २’ मध्ये पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा हटके टीझर समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाला असून टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

टीझरमध्ये ललित प्रभाकरसह अभिनेता स्वप्नील जोशी व भाऊ कदमही दिसत आहेत. आबुराव आणि बाबुराव अशी यांच्या पात्राची नावे असून त्यांनी चित्रपटाला अजूनच रंगत आणली आहे. तसेच टीझरमध्ये ललित घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात आलेला दिसत आहे. प्रेमात त्याचा निर्णय चुकल्यामुळे तो देवाला दोष देत असल्याने प्रत्यक्ष देवानेच ‘होऊ दे तुझ्या मनासारखं’ म्हणत त्याला त्याच्या नशीबातील प्रेम बदलण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतला. आता या संधीने ललितचे नशीब उघडेल का ? हे पाहणे रंजक ठरणार आहे. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकरसह अभिनेत्री ऋचा वैद्य व रिधिमा पंडित यांची खास भूमिका पाहायला मिळणार आहे.

‘आजच्या पिढीचा प्रेमाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनला साजेशी अशी अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी याआधीही सुपरहिट प्रेमकथा असलेले चित्रपट केले आणि आता अशीच एक सुपरहिट व हटके प्रेमकथा आम्ही सादर करणार आहोत’, असे निर्माते संजय छाब्रिया यांनी सांगितले. तर सतीश राजवाडे म्हणाले की, ‘प्रेमाची गोष्ट २’ ही एक ताजी प्रेमकहाणी आहे, जी व्हीएफएक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद होतो आहे’ .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत. तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.