मुंबई : कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करीत आहे. याबाबत आलेल्या तीन अर्जांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.

दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून सध्या मोठा वाद सुरू असून हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या विषयावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. तसेच जैन समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अखेर पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्यात यावे व कबुतरखाना बंद करू नये असे आदेश राज्य सरकारने ७ ऑगस्टला दिले होते.

मुंबई महापालिकेने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर १३ ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्यावेळी कबुतरांना खाद्य घालण्यावरील बंदीचा मुंबई महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. मात्र दादर येथील कबुतरखान्याजवळ कबुतरांना दररोज सकाळी सहा ते आठ या कालावधीत खाद्य देण्याच्या मागणीवर विचार सुरू असल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयात दिली.

त्यावेळी महापालिकेने कोणतीही परवानगी देण्यापूर्वी आधी त्याबाबत जाहीर सूचना काढावी आणि प्रस्तावावर हरकती-सूचना मागवाव्यात. त्यानंतर, कबुतरांना सकाळी दोन तास खाद्य देण्याचा निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने आता कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य घालण्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.

हरकती व सूचनांसाठी केवळ दहा दिवस…नागरिकांनी सोमवार १८ ऑगस्ट ते शुक्रवार २९ ऑगस्ट दरम्यान हरकती / सूचना नोंदवाव्यात असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. केवळ दहा दिवसांचा अवधी असून मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे.

महापालिकेकडे तीन अर्ज….

मुंबईतील कबुतरखान्यांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी आणि श्रीमती पल्लवी पाटील, ऍनिमल अँड बर्डस् राईटस् ऍक्टिविस्ट यांच्याकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. हे तिनही अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?guest_user-english या लिंकवर अवलोकनासाठी उपलब्ध आहेत.

येथे हरकती व सूचना पाठवाव्या…

नागरिकांनी संकेतस्थळावर दिलेल्या या अर्जांचे अवलोकन करुन कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे (Control Feeding) किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत त्यांच्या हरकती / सूचना suggestions@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ ते शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीदरम्यान पाठवाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

तसेच, हरकती / सूचना लेखी स्वरुपात प्रत्यक्ष सादर करावयाच्या असतील तर त्या ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी, तिसरा मजला, एफ दक्षिण विभाग कार्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई-४०० ०१२’ येथे सोमवार १८ ऑगस्ट ते शुक्रवार २९ ऑगस्ट या कालावधीदरम्यान कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.