संदीप आचार्य

राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. राज्य कृती दलाने ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून सरकारला सादर केल्याचे आरोग्य विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा एकदा भाविकांसाठी सुरू होतील, असे चित्र आहे.

मंदिराचे दरवाजे सकाळी लवकर उघडावेत आणि उशिरा बंद करावेत. मंदिर बंद असण्याची वेळ किमान असावी. आजुबाजूचा परिसर सतत स्वच्छ व प्रकाशमान असावा, दर्शनासाठी ठरावीक वेळ निश्चित करून तसे टप्पे ठरविण्यात यावेत. थेट गाभाऱ्यातील दर्शन कमीत कमी व्हावे यासाठी बंधने आणताना आडव्या पट्टय़ांचा वापर करावा. धार्मिक स्थळ परिसरात ५०० पेक्षा जास्त लोक एकावेळी उपस्थित नसावेत तसेच सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन व्हावे, धार्मिक स्थळी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराच्या तापमानाची व प्राणवायूची (ऑक्सिजन) पातळीची तपासणी व्हावी, पुरेशा सॅनिटाइजरची व्यवस्था तसेच चोवीस तास स्वच्छतेची काळजी घेतली जावी. मंदिर वा धार्मिक स्थळी येणाऱ्यांना मुखपट्टीचा वापर बंधनकारक करणे. तसेच या नियमांची योग्य प्रकारे अमंलबजावणी व्हावी यासाठी पुरेसा पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवावा, अशी मार्गदर्शक तत्त्वे राज्य कृती दलाने सुचवली असून मुख्य सचिवांच्या पातळीवर यावर सखोल चर्चा होऊन त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. यानंतर धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दिवाळीनंतरच..

* युरोपातील अनेक देशांनी करोनाची दुसरी लाट आल्यामुळे त्यांच्याकडील धार्मिक स्थळे पुन्हा बेमुदत काळासाठी बंद केली आहेत. तशी परिस्थिती आपल्याकडे होऊ नये ही मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याने मंदिरे सुरू करण्याबाबत सावधानता बाळगण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

* राज्य सरकारने घेतलेली खबरदारी लक्षात घेता दुसरी लाट आपल्याकडे येण्याची शक्यता कमी आहे. मात्र अशी लाट आल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज आहोत, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. मंदिरे उघडण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाणार असून भाविकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊनच मंदिरे सुरू केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.