मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील ४९ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी ७ पोलिसांना शौर्य पदक, ३ पोलिसांना उल्लेखनिय सेवेसाठी राष्ट्रपती पदक देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरूवारी पोलीस पदकांची घोषणा केली.

असाधारण शौर्य दाखविणाऱ्या पोलीस, गृहरक्षक आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी शौर्य पदक (जीएम) प्रदान करण्यात येते. गृहमंत्रालयाने गुरूवारी देशातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक व नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण १ हजार ९० जणांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली. त्यात २३३ जणांना शौर्य पदके, ९९ जणांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम) आणि ७५८ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम) जाहीर करण्यात आले आहे. या २३३ शौर्य पदकांपैकी ५४ पदके नक्षलवाद प्रभावित भागात कार्यरत पोलिसांना जाहीर झाली आहेत. १५२ पोलीस जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातले आहेत. ईशान्य भारत क्षेत्रातील ३ आणि इतर क्षेत्रातील २४ जणांना पदक जाहीर झाले आहे.

राज्यातील ४९ पोलिसांचा सन्मान

राज्यातील ४९ पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर करून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यात ७ पोलिसांना शौर्य पदक, ३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले. राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकाच्या (पीएसएम) मानकऱ्यांमध्ये मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांचा समावेश आहे.