मुंबई महापालिकेच्या के-पूर्व विभाग कार्यालयातील परवाना विभागातील प्रिंटर बंद पडला असून परवाना शुल्क भरल्यानंतरही त्याची प्रत मिळत नसल्यामुळे दुकानदार, हॉटेल मालक त्रस्त झाले आहेत.
दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पालिका कार्यालयांमध्ये परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी दुकानदार, हॉटेल मालक आणि अन्य व्यावसायिकांची गर्दी होते. इतर कार्यालयांप्रमाणे के-पूर्व विभागातही परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी अनेक जण येत होते. परंतु या कार्यालयातील परवाना भरणा विभागातील प्रिंटरच बिघडल्याने आणि त्याची दुरुस्ती वेळीच होऊ न शकल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकांना शुल्क न भरताच माघारी जावे लागत होते. परवानाधारकांना खेटे घालावे लागू नयेत यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी एक शक्कल लढविली. येणाऱ्या परवानाधारकांकडून शुल्क घेऊन त्यांना पावती देण्यात येत होती. प्रिंटर दुरुस्त केल्यानंतर त्याची प्रत उपलब्ध करण्यात येईल, असेही त्यांना सांगण्यात येत होते. मात्र पालिकेच्या या कारभाराबद्दल साशंक असलेल्या परवानाधारकांनी शुल्क न भरणे पसंत केले.
अंधेरी परिसरातील समाजसेवक अजीज अमरेलीवाला यांनी या संदर्भात पालिका आयुक्तांचे सचिव, अतिरिक्त आयुक्त, के-पूर्व विभागातील सहाय्यक अधिकारी, परवाना विभागाचे अधिकारी यांच्याकडे तक्रारही केली.
मात्र प्रिंटरची दुरुस्ती होऊ शकलेली नाही. शुल्क भरलेल्या परवानाधारकांना नूतनीकरण केलेली परवान्याची प्रत घेण्यासाठी प्रिंटर दुरुस्त झाल्यावर पालिका कार्यालयात पुन्हा एकदा रांग लावावी लागणार आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.