मुंबई : आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती हे रचनात्मक अर्थव्यवस्थेचे (ऑरेंज इकॉनॉमी) तीन स्तंभ असून सर्जनशील अर्थव्यवस्थेचा (क्रिएटिव्ह इकॉनॉमी) चा पुढील १० वर्षांत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) मोठा वाटा असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर न मोजता संगीत, कला, नृत्य यालाही महत्त्व द्यावे लागेल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

‘जागतिक दृक्-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे ( वेव्ह्ज) उद्घाटन मोदी यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड येथे करण्यात आले. व्हेव्ह्ज, ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे, तर ती संस्कृती, सर्जनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीची लाट आहे. आज जग नवीन कथांचा धांडोळा घेत असताना भारताकडे हजारो वर्षांपूर्वीच्या कथांचा कालातीत, विचारप्रवर्तक आणि खऱ्या अर्थाने वैश्विक खजिना आहे. सर्जनशील व्यक्ती ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात.

जगभरातील सर्जनशील व्यक्तींनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनवावे, असे आवाहन करून मोदी म्हणाले, जगासाठी भारतात सर्जनशीलतेची ही उचित वेळ आहे. स्क्रीनचा आकार लहान होत चालला असला तरी व्याप्ती अमर्याद वाढत आहे. पंतप्रधानांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास विशद केला. चित्रपटसृष्टीतील अर्ध्वयू दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’, हा पहिला भारतीय चित्रपट ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला होता.

राज कपूर यांची रशियातील लोकप्रियता, कान येथे सत्यजित रे यांची जागतिक स्तरावरून झालेली प्रशंसा, आणि ‘आरआरआर’ चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासह मिळालेले यश आदी बाबींचा उल्लेख मोदी यांनी केला. गुरुदत्त यांच्या चित्रपटांमधील काव्य, ए. आर. रेहमान यांची सांगीतिक प्रतिभा, आणि एस. एस. राजामौली यांची कथा मांडण्याची विलक्षण धाटणी नमूद करून या कलाकारांनी भारतीय संस्कृती जगभरात पोचविल्याचे मोदी यांनी सांगितले.

या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, डॉ. एल. मुरुगन, ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, शहारुख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी गुरुदत्त, श्रीमती पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

करमणूक क्षेत्र विकासाचे नवे इंजिन : फडणवीस

करमणूक क्षेत्र हे देशाच्या विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो. या सगळ्यात महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी असून भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. राज्य शासन या परिवर्तनाला पोषक वातावरण तयार करीत असून यासाठी सक्षम धोरण राबविले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.

भारत आज चित्रपट निर्मिती, डिजिटल सामग्री, गेमिंग, फॅशन, संगीत आणि भव्य महोत्सव (लाइव्ह कॉन्सर्ट) आदींसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. देशातील अब्जावधी सृजनशील तरुणांनी आपल्या कथा जगासमोर आणाव्यात. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान