शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांमधील आजारांचे वेळेत निदान होऊन त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या माध्यमातून आरोग्यासंदर्भातील विविध उपक्रम हाती घेतले आहेत. हे सर्व उपक्रम सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. मात्र आता हे उपक्रम मुंबईतील खासगी रुग्णालयांमार्फतही राबविले जाणार आहेत, त्यामुळे सरकारच्या या योजना अधिक नागरिकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कोकण रेल्वेवरील एक्स्प्रेसच्या डब्यात तात्पुरती वाढ

राज्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातील झोपडपट्टीतील नागरिक आपल्या आरोग्याबाबतीत सजग नसतात. त्यामुळे क्षयरोग, मौखिक आजार, कर्करोग यासारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी वैद्यकीय विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यात मौखिक आरोग्य मिशन, लठ्ठपणा, क्षयरोग, स्तनाचा कर्करोग, अवयवदान, रक्तदान, मोतीबिंदू, थायरॉईड आणि ऑस्टिओपोरोसिस आदी व्याधींवरील उपचारांचा समावेश आहे. त्यातील क्षयरोग, स्तनाचा कर्करोग यावरील उपचार, अवयवदान, रक्तदान हे उपक्रम नुकतेच वैद्यकीय विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत. थायरॉईड आणि ऑस्टिओपोरोसिससंदर्भातील उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. हे उपक्रम अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार २८ मार्चला मुंबईतील खासगी रुग्णालयांच्या विशेष बैठक घेण्यात आली होती.

हेही वाचा >>> राष्ट्रगीत अवमान प्रकरण : ममता बॅनर्जी यांना उच्च न्यायालयाचा तडाखा; दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधातील अपील फेटाळले

या बैठकीला मुंबईतील जसलोक रुग्णालय, बॉम्बे रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय, वोक्हार्ट रुग्णालय, पी.डी. हिंदुजा रुग्णालय, लिलावती रुग्णालय, नानावटी रुग्णालय, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय, फोर्टीस, ज्युपिटर आणि अपोलो रुग्णालयाच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच मुंबई महानगरपालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये आणि राज्य सरकारची तीन रुग्णालये आणि जे.जे. रुग्णालयाच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विविध व्याधींवरील उपचारासाठीच्या योजना खासगी रुग्णालयांमार्फत वर्षभर राबवण्याच्या तसेच सर्व रुग्णांच्या नोंदी घेऊन ती माहिती सरकारच्या पोर्टलवर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेणेकरून या आजारांबाबत योग्य माहिती संकलन होण्यास मदत होईल. यावेळी खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनीही हे उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मकता दाखवली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private hospitals in mumbai will also implement government initiatives mumbai print news zws
First published on: 29-03-2023 at 15:52 IST