scorecardresearch

‘अदानी’च्या अर्जावर प्रक्रिया सुरू; नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, पनवेल भागात वीज वितरण परवाना

मुंबई उपनगरातील रिलायन्सचा वीज वितरण व्यवसाय ताब्यात घेऊन चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. विस्ताराचे वेध लागले.

‘अदानी’च्या अर्जावर प्रक्रिया सुरू; नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, पनवेल भागात वीज वितरण परवाना
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : मुंबई उपनगरातील वीज वितरण व्यवसायात जम बसवल्यानंतर महाराष्ट्रात महावितरणच्या परिसरात विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या अदानी समूहाने नवी मुंबई महानगरपालिका, मुलुंड-भांडुप, ठाण्यातील काही भाग आणि पनवेल, उरण, तळोजाच्या परिसरात वीज वितरणाचा समांतर परवाना मागण्यासाठी राज्य वीज नियमक आयोगाकडे दाखल केलेल्या अर्जावर लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्याची ही सुरुवात मानली जात आहे.

मुंबई उपनगरातील रिलायन्सचा वीज वितरण व्यवसाय ताब्यात घेऊन चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. विस्ताराचे वेध लागले. मुंबईलगतच्या इतर भागांत वीज वितरण व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना अदानीने आखली असून केंद्रीय वीज कायद्यातील दुरुस्ती काही कारणांनी रखडली तरी उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गाचा उपयोग करून नव्या भागांत विस्तारीकरण करण्याचा अदानी समूहाचा मानस असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ३१ ऑगस्टला दिले होते. त्यानंतर अदानीने नवी मुंबईसह आसपासच्या परिसरात वीज वितरण परवाना मिळावा यासाठी अर्ज केल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २ ऑक्टोबरला दिले होते.

 महावितरणचे भांडुप परिमंडळ हे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत घरगुती वीजग्राहक आणि हजारो व्यावसायिक वीजग्राहक असलेला भाग आहे. नवी मुंबईचा परिसर कमी वीजहानी आणि घसघशीत महसूल देणारा असून वीज वितरण व्यवसायातील दुभती गाय आहे. राज्यातील अनेक परिमंडळात महसूल टंचाई भेडसावणाऱ्या महावितरणसाठी हा परिसर म्हणजे हक्काचा महसूल गोळा करून देणारा परिसर आहे.  या भागातील वीज वितरण परवान्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई लि. या कंपनीमार्फत राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांत किमान ५ लाख वीजग्राहक कंपनीकडे असतील असा अंदाज या अर्जात व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात हरकती व सूचना दाखल करण्यासाठी पुढील ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. लोकांनी दाखल केलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन सुनावणीनंतर राज्य वीज नियामक आयोग अदानीला नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, ठाण्याचा आणि पनवेल, उरणच्या काही भागात वीज वितरण परवाना देण्याबाबत निर्णय देईल. नवीन वर्षांत या परवान्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:57 IST

संबंधित बातम्या