लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी व त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित ११३ कोटी ५० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. त्यात ॲम्बी येथील बंगला, मुंबईतील कार्यालये, रायगड जिल्ह्यातील जमिनीचा समावेश आहे. ईडीने ४५ कोटी रुपयांचे शेअर्स, म्युच्युअल फंड, मुदत ठेवींवरही टाच आणली आहे.
आणखी वाचा-अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
टेकचंदानीविरोधात तळोजा आणि चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला आहे. तक्रारीनुसार मेसर्स सुप्रिम कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून टेकचंदानी आणि इतरांनी तळोजा, नवी मुंबई येथील गृहनिर्माण प्रकल्पात संभाव्य घर खरेदीदारांकडून प्रचंड निधी गोळा केला. तपासानुसार १७०० हून अधिक ग्राहकांनी ४०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी टेकचंदानीला ईडीने १८ मार्च रोजी अटक केली होती. याप्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत आहे.