मुंबई : जोपर्यंत शैक्षणिक श्रेयांक खात्याचा तपशील विद्यापीठाने सांगितलेल्या संकेतस्थळावर टाकला जाणार नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असा इशारा मुंबई विद्यापीठ प्रशासनाने एका परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना दिला आहे.
सध्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ उन्हाळी सत्रांतर्गत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने नियोजन केले आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक श्रेयांक खात्याचा (एबीसी आयडी) तपशील मुंबई विद्यापीठाकडे सादर करण्यास काही संलग्नित महाविद्यालयांकडून वारंवार विलंब होत आहे.
त्यामुळे मुंबई विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी जोपर्यंत शैक्षणिक श्रेयांक खात्याचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकला जाणार नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असा इशारा मुंबई विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना दिला आहे.
अन्यथा गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र नाही
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक श्रेयांक खाते तयार करण्यासाठी आणि संबंधित तपशील विद्यापीठाकडे सादर करण्यासाठी काही महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र ‘डीजी लॉकर’ प्रणालीद्वारे उपलब्ध करता येणार नाही, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.