मुंबई : पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केल्याबद्दल सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांनी बडतर्फीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केल्यानंतर प्रक्रियात्मक त्रुटी व बाल न्याय कायद्यांतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा गैरवापर केल्याच्या आरोपाप्रकरणी महिला आणि बाल विकास विभागाने याचिकाकर्त्यांची चौकशी केली होती. चौकशीअंती अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना गैरवर्तन आणि नियमांचे पालन न केल्याबद्दल याचिकाकर्ते एल. एन. दानवडे आणि कविता थोरात यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. दानवडे आणि थोरात यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या बडतर्फीचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा करून तो रद्द करण्याची मागणी दोघांनी केली आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या याचिकेची दखल घेऊन राज्य महिला आणि बाल विकास विभागाला नोटीस बजावली. तसेच, १८ जून रोजी प्रकरणाची सुनावणी ठेवली.

सरकारने गेल्यावर्षी जूनमध्ये आपल्याला कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. पुढे आपली चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तथापि, चौकशी अहवालाची प्रत आपल्याला देण्यात आली नसल्याचा दावा थोरात यांनी याचिकेत केला आहे. तसेच, पुणेस्थित बाल न्याय मंडळाच्या (जेजेबी) सदस्यपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याची कारवाई बेकायदेशीर असल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान, दानवडे यांनी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. जामिनाच्या अटींमध्ये रस्ते सुरक्षेवर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचा समावेश होता. या निर्णयामुळे पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे निर्णयाचा फेरविचारासाठी अर्ज केला होता. त्यानंतर, मंडळाने आदेशात बदल करून अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात पाठवले होते. तथापि, उच्च न्यायालयाने या मुलाची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय ?

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात १९ मे २०२४ रोजी मद्यधुंद अवस्थेतील १७ वर्षांच्या मुलाने त्याच्या आलिशान पोर्शे गाडीने दोघांना उडवले होते. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे पालक, दोन डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हालनोर, ससून रुग्णालयाचे कर्मचारी अतुल घाटकांबळे, दोन मध्यस्थ, आदित्य अविनाश सूद, आशिष मित्तल आणि अरुण कुमार सिंग हे रक्ताच्या नमुन्यात फेरबदल केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत आहेत.