मुंबई : ‘गोध्रा हत्याकांडानंतर काही दिवसांनी नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आले. आजही नागरिक भांडणाविना व्यवस्थित राहत आहेत. मात्र काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी वादग्रस्त वक्तव्ये करून वातावरण बिघडविण्याचे काम करतात. गुजरातची जनता मिळूनमिसळून राहते, हे सत्य आहे. गुजरात सरकार सोडल्यास, गुजरातच्या जनतेमध्ये कोणताही तणाव नाही आणि सर्वांना शांततेचे जीवन जगायचे आहे’, असे मत गोध्रा हत्याकांडादरम्यान चर्चेत आलेल्या कुतुबुद्दीन अन्सारी यांनी व्यक्त केले.
गोध्रा येथे २००२ साली साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्याच्या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला होता. या तणावपूर्ण वातावरणात हात जोडून ढसाढसा रडतानाचे कुतुबुद्दीन अन्सारी आणि हातात तलवार घेतलेल्या अशोक परमार यांचे छायाचित्र सर्वत्र पसरून दोघे चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. यापैकी कुतुबुद्दीन अन्सारी मुंबई सर्वोदय मंडळाने महात्मा गांधी जयंतीनिमित्त गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ‘शांति की खोज में’ संवाद सभेत सहभागी झाले होते. यावेळी कुतुबुद्दीन अन्सारी यांचे पत्रकार मित्र कलीम सिद्दीकी, मुंबई सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष टी. आर. के. सोमैया, जयंत दिवाण, विजय दिवाण आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कुतुबुद्दीन अन्सारी यांनी गोध्रा हत्याकांड व गुजरातमधील दंगलीचा घटनाक्रम कथन करीत स्वतःला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले, याबद्दल सांगितले. तसेच यासंदर्भातील एकूणच अनुभव आणि विविध गोष्टी सांगताना कुतुबुद्दीन अन्सारी यांना अश्रू अनावर आले. तर महात्मा गांधींचा हिंदुस्थान सुरक्षित आहे आणि त्यांच्या विचारांमधील हिंदुस्थान कोणीही बाजूला काढून टाकू शकत नाही, असे मत मान्यवरांनी मांडले.
‘गोध्रा हत्याकांडात निष्पाप नागरिकांचे जीव गेले आणि याबद्दल आजही दुःख आहे. साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्याच्या घटनेनंतरच्या तणावाबाबत गोध्रामधील लोकांमध्येच चर्चा होऊन पडसाद उमटले असते. अहमदाबादपासून गोध्रा दूर आहे. मात्र एकूणच सदर घटना एका रात्रीत संपूर्ण गुजरातमध्ये वेगळ्या पद्धतीने पसरवली गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २८ फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषदेने गुजरात बंदची हाक दिली. तेव्हा एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आणि ठिकठिकाणी संतापाची लाट उसळत सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान गुजरातमध्ये ठिकठिकाणी आग लागण्यास सुरुवात झाली. गेली ५० वर्ष आनंदाने राहणाऱ्या आणि कोणतेही शत्रूत्व नसलेल्या लोकांची घरे शोधून शोधून जाळली.
बहुसंख्य निष्पाप नागरिक व निरागस मुलांचे जीव गेले. एका रात्रीत सर्व चित्र भयानक झाले. या घटनेनंतर अनेकजण मला भेटायला आले व त्यांनी चर्चा केली व मलाही अनेक गोष्टी कळल्या. या घटनेतील पीडित असल्यामुळे मला गुजरातमध्ये राहणे कठीण झाले होते. भीतीचे वातावरण होते. त्यानंतर सरकारने मला कोलकत्ताला बोलावले आणि सर्व सोयी-सुविधा दिल्या. मात्र हिंदू – मुस्लिमच्या मुद्यावरून पुन्हा दंगल पेटेल अशी धाकधूक कायम होती. त्यामुळे कुटुंबासह पुन्हा गुजरातला येण्याचा आणि आपण जिथे वाढलो, तिथेच मुलांना शिकविण्याचा निर्णय घेतला’, असा अनुभव कुतुबुद्दीन अन्सारी यांनी कथन केला.