इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी विमानतळाजवळच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. उद्योगपती गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदींच्या कथित संबंधांवर राहुल गांधी यांनी भाष्य केलं. तसेच या संबंधांवर आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या त्यांनी यावेळी दाखवल्या.

राहुल गाधी यांनी तीन आंतरराष्ट्रीय आर्थिक वर्तमानपत्रांमधील बातम्या दाखवल्या. यामध्ये गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच अदाणी यांच्या घोटाळ्यांमध्ये पंतप्रधानही सहभागी असल्याचं म्हटलं आहे. या वर्तमानपत्रांनी यासंबंधीचे पुरावे त्यांच्याकडे आहेत असंही म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी या बातम्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्या.

खासदार राहुल गांधी यावेळी म्हणाले, गौतम अदाणी हे त्यांच्या परदेशी भागीदारांबरोबर मिळून भारतातल्या शेअर बाजाराची दिशाभूल करत आहेत. परदेशी भागीदारांबरोबर मिळून भारतातल्या पायाभूत सुविधा ते खरेदी करत आहेत. परंतु, पंतप्रधान मोदी यावर काहीच बोलत नाहीत, ते याप्रकरणी शांत आहेत.

राहुल गांधी म्हणाले, अदाणींच्या कंपनीत पैसा कोणाचा आहे? तो पैसा अदाणींचा आहे की आणखी कोणाचा आहे? जर तो पैसा अदाणींचा नसेल तर मग तो नेमका कोणी गुंतवला आहे? याची उत्तरं मिळाली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी काहीच बोलत का नाहीत? आपल्या देशातल्या तपास यंत्रणा गौतम अदाणी प्रकरणावर काहीच कार्यवाही का करत नाहीत? सीबीआय, ईडीसारख्या संस्था अदाणी प्रकरणाचा तपास का करत नाहीत? या संस्था अदाणी यांची चौकशी का करत नाहीत? असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केले.

अदाणी जो पैसा वापरतायत तो कोणाचा आहे?

राहुल गांधी म्हणाले, भारताची मालमत्ता गौतम अदाणी खरेदी करत आहेत. अदाणी हे परदेशी भागीदारांच्या मदतीने शेअर्सच्या किंमती वाढवून त्यातून पैसा कमवत आहेत आणि याच पैशातून ते आपल्या देशाची संपत्ती खरेदी करत आहेत. याबाबत या आंतरराष्ट्रीय आर्थिक वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. या वर्तमानपत्रांकडे सगळे पुरावे आहेत, कंपन्यांचे अंतर्गत ई-मेल्स आहेत. गौतम अदाणी जो पैसा वापरत आहेत तो कोणाचा आहे? त्यांचा स्वतःचा की दुसऱ्या कोणाचा आहे?

“अदाणींची चिनी व्यावसायिकाबरोबर भागीदारी, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर”

राहुल गांधी म्हणाले, या सगळ्या कामात गौतम अदाणी यांचा भाऊ विनोद अदाणी हा मास्टरमाईंड आहे. त्यांचे दोन भागीदार आहेत. यापैकी एक म्हणजे नसमी अली शबान अली आणि दुसरा चांग चुंग लींग हा एक चिनी नागरिक आहे. एकीकडे गौतम अदाणी हे या परदेशी व्यावसायिकाबरोबर मिळून भारतातल्या संस्था, विमानतळं, बंदरं आणि पायाभूत सुविधा विकत घेत आहेत, भारतातल्या शेअर बाजाराची दिशाभूल करत आहेत. दुसऱ्या बाजूला ते चिनी व्यावसायिकाबरोबर भागीदारी करत आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. कारण अदाणी यांची कंपनी देशाच्या संरक्षण विभागात, बंदरांच्या क्षेत्रात काम करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्याने अदाणींना क्लीन चिट दिली तोच अदाणींच्या चॅनेलचा संचालक झाला आहे”

राहुल गांधी यांनी यावेळी तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, मागे सेबीद्वारे गौतम अदाणी यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली. सेबीच्या ज्या अधिकाऱ्याने अदाणी यांना क्लीन चिट दिली, तोच आता गौतम अदाणी यांच्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचा संचालक झाला आहे. हे सगळं त्यांचं जाळं आहे. हे सगळेजण मिळून देशाची फसवणूक करत आहेत. देशाची संपत्ती विकत घेत आहेत, पंतप्रधान मोदी मात्र यावर गप्प आहेत. ते या प्रकरणी शांत का बसले आहेत? सीबीआय, ईडीसारख्या संस्था स्वस्थ का बसल्या आहेत? अदाणी प्रकरणाचा तपास अथवा त्यांची साधी चौकशीसुद्धा का केली जात नाही?